भारतातील प्राचीन शास्त्रांच्या संशोधनाची गरज

The need for research on ancient sciences in India – Dr Gaikaiwari

भारतातील प्राचीन शास्त्रांच्या संशोधनाची गरज – डॉ गायकैवारी

पुणे : भारताकडे अत्यंत प्राचीन असलेले विविध शास्त्र आहेत, ज्यांची माहिती विविध ग्रंथांमध्ये आणि पुराणांमध्ये आहे, त्यावर सातत्याने संशोधन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राघवेंद्र गायकैवारी यांनी आज येथे केले. डॉ. विजया देशपांडे लिखित रसोपनिषद या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. भांडारकर संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

यावेळी लेखिका, संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन, मानद सचिन प्रा. सुधीर वैशंपायन, विश्‍वस्त प्रदीप रावत, डॉ. स्मिता लेले, इन्फोसिस फौंडेशनचे प्रा. प्रमोद जोगळेकर व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. गायकैवारी पुढे म्हणाले की, आपल्याकडे अनेक प्राचीन ग्रंथ आहेत, ज्यातील श्‍लोकांचा, माहितीचा मोठा खजिना उपलब्ध आहे, मात्र संशोधन सातत्याने केल्यास सर्व जगालाच त्याचा उपयोग होईल. पूर्वी काही गोष्टींचे प्रात्यक्षिक करुन दाखवले जात असे, त्यावर संशोधन होत होत त्याचे शास्त्र झाले आहे. मात्र त्यावरही पुढे विविधांगी संशोधन करत राहिले पाहिजे.

लेखिका डॉ. देशपांडे यांनी पुस्तकामागची भूमिका स्पष्ट करतांना सांगितले की, रसोपनिषद हे पुस्तक प्राचीन हस्तलिखितांचा आधार घेवून तयार केले आहे. आपल्याकडे दोन हस्तलिखिते अस्तित्वात आहेत. जे केरळमध्ये कोट्टायम येथे के. सांबशिवशास्त्री यांना शंभर वर्षांपूर्वी सापडले होते.

विविध घटक वापरुन नवीन पदार्थ बनवणे, या किमयाशास्त्राला भारतात मोठी परंपरा आहे. 10 व्या ते 16 व्या शतकादरम्यान संस्कृत आणि आपल्या प्रादेशिक भाषांमध्ये रसायनशास्त्रावर शेकडो पुस्तके लिहिली गेली आहेत. ज्यातील रसोपनिषद हे बहुधा अकराव्या शतकातील असावे. रसोपनिषद हा काही बाबतीत असामान्य ग्रंथ आहे.

संस्कृत श्‍लोकांचा अभ्यास करून विज्ञानाच्या इतिहासाचा शोध घेण्याच्या क्षेत्रात अधिकाधिक संशोधक तयार व्हायला हवेत. या पुस्तकात रसोपनिषदांच्या सर्व अठरा अध्यायांचा परिचय, संपूर्ण इंग्रजीत अनुवाद आणि त्यानंतर वनस्पतींचे शब्दकोष आणि स्पष्टीकरणासह रासायनिक संज्ञा दिलेल्या आहेत.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. लेले म्हणाल्या की, आपल्या देशातील वारसा आपण जपला पाहिजे, त्यासाठी संस्कृत आणि प्राचीन लिप्या यांचा अभ्यास केला गेला पाहिजे. त्यामधील तज्ञांनी हा वारसा समाजाच्या कल्याणासाठी सोप्या भाषेत मांडला पाहिजे. तरच अनेक जुन्या ग्रंथांचा उपयोग संशोधनासाठी करुन घेता येईल, ज्यातून नवनवीन अर्थ सापडतील.

इन्फोसिस फौंडेशन प्रकल्पाअंतर्गत या संशोधनपर पुस्तकासाठी देखील देणगी देण्यात आली असून अशाच एकूण 5 पुस्तकांसाठी सहकार्य राहणार असल्याचे प्रकल्पप्रमुख श्री. जोगळेकर यांनी यावेळी सांगितले. या प्रकल्पाच्या समनव्यक स्नेहा सप्रे यांनी सूत्रसंचालन केले तर भूपाल पटवर्धन यांनी आभार मानले.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *