Dedicated Commission for OBC, VJ NT Reservation Visits Pune on 21st May
ओबीसी, व्हीजे एनटी आरक्षणासाठी गठित केलेल्या समर्पित आयोगाची २१ मे रोजी पुणे भेट
नागरिकांना नोंदणीसाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयात कक्षाची स्थापना
पुणे : नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षण देण्यासंदर्भात नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी समर्पित आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. आयोग पुणे येथे २१ मे २०२२ रोजी भेट देणार असून जिल्ह्यातील नागरिकांना आयोगाच्या भेटीच्यावेळी मते मांडता यावीत यासाठी नागरिकांची नोंदणी करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर परिषद प्रशासन शाखेत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायती आणि शहरातील महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी, व्हीजे एनटींना आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग गठित केला आहे.
राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागावर कार्यक्रम जाहीर केला आहे.
या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावेत यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे अथवा जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन कक्षात आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी.
समर्पित आयोग पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात २१ मे रोजी सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत भेट देणार आहे. या वेळेत नागरिकांना आपली मते आयोगापुढे मांडता येतील. नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षात नावाची नोंदणी २० मे २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत करावी.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या dedicatedcommissionobc@gmail.com किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या dpopune01@gmail.com या ईमेलवरदेखील नोंदणी करता येईल, असे नगरपालिका प्रशासनाचे उपायुक्त दत्तात्रय लाघी आणि जिल्हा प्रशासन अधिकारी चंद्रकांत खोसे यांनी कळविले आहे.
हडपसर न्युज ब्युरो