We will do our best to build the sculptures of Jagat Guru Tukaram Maharaj and Santshrestha Dnyaneshwar Maharaj: Aditi Tatkare
जगत् गुरू तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे शिल्प उभारण्यास सर्वतोपरी सहकार्य करू : आदिती तटकरे
देहू संस्थान, शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे उभारण्यात आलेल्या आरओ प्लॅन्ट, एलईडी वॉलचे लोकार्पण
देहू (पुणे)- इंद्रायणी नदीच्या तिरावर जगत् गुरू तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे शिल्प उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही पर्यटन आणि सांस्कृतिक राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. शिल्पांच्या माध्यमातून आपला सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत निश्चितच पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आषाढी वारीचे औचित्य आणि शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवानिमित्त श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्रीक्षेत्र देहू आणि शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ सुमारे तीस लाख रुपये खर्चून तीन हजार, दोन हजार आणि एक हजार लिटर क्षमतेचे आरओ प्लॅट देहू संस्थानच्या आवारात बसविण्यात आले आहेत.
तसेच जगत्गुरू तुकोबारायांचे थेट दर्शन होण्यासाठी एलईडी वॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधांचे लोकार्पण आज पर्यटन आणि सांस्कृतिक राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. आरओ प्लॅन्टच्या सुविधेमुळे मंदिरात दर्शनासाठी येणार्या भाविकांना थंड आणि शुद्ध पाणी मिळणार आहे.
आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल, आदित्य धारीवाल, देहू नगरपंचायतीच्या अध्यक्ष स्मिता शैलेश चव्हाण यांची उपस्थिती होती. श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया आदी मान्यवर उपस्थित होते.
तटकरे पुढे म्हणाल्या, येऊ घातलेल्या वारीच्या निमित्ताने बसविलेल्या एलईडी स्क्रीनमुळे वारकर्यांना भगवंताचे थेट दर्शन घडेल आणि त्यांना मिळालेल्या समाधानातून त्यांचे आशीर्वाद लाभतील. जेथे लहानपणी येऊन नतमस्तक होत होते तेथे लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करताना समाधान वाटत आहे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. माणसाने माणूस म्हणूज जगताना माणुसकी जपणे महत्त्वाचे आहे. संतांचे आचारणातून सामान्यांना खूप काही शिकण्यासारखे आहे, असेही त्या म्हणाल्या.
स्वागतपर भाषणात शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी इंद्रायणी काठी जगत् गुरू संत तुकाराम महाराज यांचे ‘तुका आकाशा एवढा’ आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे ‘पसायदान’ शिल्प उभारले जावे, अशी मागणी केली. त्यास तात्काळ मान्यता देत तटकरे यांनी सांस्कृतिक आणि पर्यावरण विभागाकडून परवानगी मिळवावी, अशी सूचना करत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
आमदार सुनील शेळके म्हणाले, नागरिकांना स्वच्छ पाणी मिळणे ही मुलभूत गरज आहे. देहू संस्थान आणि शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानने धारीवाल परिवाराच्या सहकार्याने ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो.
प्रकाश धारीवाल म्हणाले, देहू संस्थानात आल्यानंतर पंढरीच्या दारी आल्यासारखे वाटत आहे. भाविकांना शुद्ध पाणी मिळाल्यानंतर त्यांचे मिळालेले आशीर्वाद आम्हाला मोलाचे वाटतात. अशा दातृत्वाच्या समाजकार्यातून पुढील पिढीलाही आदर्श मिळावा, त्यांच्या हातूनही समाजकार्य घडावे, अशी भूमिका असल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविक श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप नितीन महाराज मोरे यांनी केले. बापूसाहेब मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत गौरी खाबिया, शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नंदकुमार बंड, शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष अश्विनी पाचारणे यांनी केला. प्रकाश धारीवाल यांचा विशेष सन्मान राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप राक्षे यांनी केले तर आभार हभप अजित मोरे यांनी मानले.
हडपसर न्युज ब्युरो