Night landing facility to be launched from Shirdi Airport soon – Managing Director Deepak Kapoor
शिर्डी विमानतळावरून लवकरच नाईट लॅडींग सुविधा सुरू करणार -व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर
शिर्डी येथून आतापर्यंत २ लाख किलो मालाची निर्यात, कार्गो क्षमता वाढविण्यासाठी कॉर्गो हब बांधणार
शिर्डी : शिर्डी विमानतळाहून नाईट लॅडींग विमानसेवा सुरू करण्यासाठी नागरी उड्डयन महानिदेशनालय (DGCA) ची टीम मे 2022 अखेर येथील नाईट लॅडींग सुविधेची तपासणी करणार आहे. डीजीसीएची परवानगी प्राप्त झाल्यावर शिर्डी येथून लवकरात लवकर नाईट लॅडींग सुविधा सुरू करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी आज दिली.
शिर्डी विमानतळ व परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या, अडचणी जाणून घेण्यासाठी श्री.कपूर यांनी शिर्डी विमानतळावर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शिर्डी विमानतळ प्रवेश व निर्गमन सुविधा, अग्निशमन व्यवस्था, नाईट लॅडींग, कॉर्गो सेवा, काकडी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, परिसरातील स्वच्छता अशा विविधांगी प्रश्नांचा आढावा घेऊन त्यांनी शिर्डी विमानतळाची पाहणी केली.
व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर म्हणाले, शिर्डी विमानतळ हे देशातील सर्वाधिक वेगाने वाढणारे विमानतळ आहे. शिर्डी येथून आतापर्यंत २ लाख किलो मालाची निर्यात करण्यात आली आहे. कार्गोने भाजीपाला, फुले व फळे हे बंगळुरू, चेन्नई व दिल्ली येथे नियमित पाठण्यात येत आहे. ही सुविधा व्यापक व मोठ्या प्रमाणात सुरू करण्यासाठी २० कोटी रूपये खर्च करुन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या माध्यमातून कॉर्गो हब बांधण्यात येणार आहे.
काकडी गावांतील प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींसोबत सखोल चर्चा करून तेथील पाण्याच्या टाकीची संपूर्णपणे डागडुजी करून दुरुस्ती करण्यासाठी लवकरात लवकर निविदा काढण्याचे आदेश देण्यात आले. त्याशिवाय इतर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, रस्ता, शाळा, उपाहारगृह याबाबत साधक-बाधक चर्चा करण्यात आली.
विमानतळावरील विक्रेत्यांच्या अडी-अडचणी यावेळी जाणून घेऊन त्यांच्या हिताचे योग्य ते निर्णय घेण्यात आले. विमानतळावरील अग्निशमन यंत्रणेचा आढावा घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहिती दीपक कपूर यांनी दिली.
शिर्डी विमानतळावरील प्रवेश व निर्गमन ठिकाणावरील अभ्यागत आरामदायी कक्ष सुविधेविषयी व्यवस्थापकीय संचालक श्री.कपूर म्हणाले, अभ्यागत आरामदायी कक्ष मधील यात्री- सुविधेची यावेळी सखोल पाहणी करण्यात आली. येथे चुकीच्या पध्दतीने लावण्यात आलेल्या फरशीची तत्काळ दुरूस्ती करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
हडपसर न्युज ब्युरो
One Comment on “शिर्डी विमानतळावरून लवकरच नाईट लॅडींग सुविधा सुरू करणार”