Dr Bharati Pravin Pawar launches National Emergency Life Support (NELS) courses for Doctors, Nurses and Paramedics
डॉ. भारती प्रवीण पवार यांनी डॉक्टर्स, परिचारिका आणि निम-वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय आपत्कालीन जीवनरक्षक (NELS)अभ्यासक्रम सुरू केला
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांनी आज डॉक्टर्स, परिचारिका आणि निम-वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय आपत्कालीन जीवनरक्षक (एनईएलएस ) अभ्यासक्रम सुरू केला.
प्रशिक्षण मॉड्यूल्स व्यतिरिक्त, एनईएलएस अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रशिक्षण संबंधी पायाभूत सुविधा विकसित करणे आणि रुग्णालये आणि रुग्णवाहिका सेवांच्या आपत्कालीन विभागांमध्ये कार्यरत डॉक्टर, परिचारिका आणि निम-वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी प्रशिक्षकांची एक तुकडी तयार करणे यांचा समावेश आहे.
केंद्रीय राज्यमंत्री म्हणाल्या की, आतापर्यंत देशातील आरोग्य सेवा व्यावसायिकांना परदेशी मॉड्यूल्स आणि सशुल्क अभ्यासक्रमांवर अवलंबून राहावे लागत होते जे महाग तर होतेच शिवाय भारताच्या लोकसंख्येच्या गरजा आणि प्राधान्यांचा विचार न करता काही विशिष्ट आपत्कालीन परिस्थितींपुरते मर्यादित होते. “म्हणूनच, पंतप्रधानांचे ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ धोरण लक्षात घेऊन भारतीय संदर्भाच्या आधारे आणि भारतात विकसित असा प्रमाणित अभ्यासक्रम एनईएलएसने उपलब्ध केला आहे ”, असे त्यांनी सांगितले.
देशाच्या कोणत्याही भागात अपघात, आपत्कालीन किंवा मानसिक आघातग्रस्तांची काळजी घेण्यासाठी भारताने तंत्रज्ञानाद्वारे सक्षम जागतिक दर्जाची, कार्यक्षम, व्यावसायिक आणि एकात्मिक प्रणाली तयार करणे ही काळाची गरज आहे.”
2017 च्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, त्यामध्ये आपत्कालीन सेवांचे नेटवर्क, जीवरक्षक रुग्णवाहिका आणि ट्रॉमा व्यवस्थापन केंद्रांची तरतूद असलेली आणि समर्पित युनिव्हर्सल ऍक्सेस नंबरशी जोडलेली एकीकृत आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली निर्माण करणे ही कल्पना अंतर्भूत आहे.
“तांत्रिक प्रगतीशी ताळमेळ राखताना रुग्णालयांच्या आपत्कालीन विभागांमध्ये कार्यरत डॉक्टर, परिचारिका आणि निम-वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने मनुष्यबळ विकासासाठी समांतर प्रयत्नांची गरज आहे. देशात सर्व प्रकारच्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितींमुळे होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी रुग्णालयात भर्ती करण्यापूर्वी आवश्यक सेवा पुरवणाऱ्यांना प्रमाणित जीवनरक्षक कौशल्यांसह हे प्रशिक्षण दिले जायला हवे.” अशी अपेक्षा डॉ. भारती प्रवीण पवार यांनी व्यक्त केली.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्र्यांनी राज्यांना आपापल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एनईएलएस कौशल्य केंद्रे स्थापन करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याची विनंती केली आणि सर्व कौशल्य केंद्रांना केवळ प्रशिक्षण देणेच नाही तर आपत्कालीन सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करण्याचे आवाहन केले. आपत्ती व्यवस्थापन कक्षाला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नियमितपणे सहभागी संस्थांशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या कामांवर देखरेख ठेवण्याची विनंती केली.
एनईएलएस अंतर्गत उपक्रमांमध्ये तज्ञांच्या सल्ल्यानुसार डॉक्टर, परिचारिका आणि निम-वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी आपत्कालीन जीवन रक्षक प्रशिक्षण मॉड्यूल विकसित करणे आणि भारतीय संदर्भानुसार आपत्कालीन जीवरक्षक संबंधी कौशल्य-आधारित प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र/राज्यांतर्गत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कौशल्य केंद्रांची स्थापना आणि ती सुसज्ज करणे समाविष्ट आहे. एसएफसी (आर्थिक वर्ष : 2021-26) अंतर्गत 120 कौशल्य केंद्रे स्थापन केली जातील (त्यापैकी 90 कौशल्य केंद्रे विकासाच्या विविध टप्प्यात आहेत).
या उपक्रमामुळे देशात प्रशिक्षित डॉक्टर, परिचारिका आणि निम-वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा एक गट तयार होईल ज्यामध्ये प्रमाणित आपत्कालीन जीवरक्षक सेवा पुरवणे आणि आपत्कालीन वैद्यकीय स्थितीमुळे होणारी जीवित हानी कमी करण्याचे कौशल्य असेल.
आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रदान करण्यासाठी एकूण आपत्ती सज्जता आणि प्रतिसाद क्षमतांमध्ये यामुळे वाढ होईल. हा अभ्यासक्रम सर्वसमावेशक असून वैद्यकीय शस्त्रक्रिया, ह्रदयविकार, श्वसन संबंधित आपत्कालीन परिस्थितीत कोविड-19 आणि अन्य रोगांसाठी व्हेंटिलेटर व्यवस्थापन प्रोटोकॉल, तसेच आघात, प्रसूती, बालरोग, साप चावणे, विषबाधा सारख्या आपत्कालीन परिस्थितीच्या व्यवस्थापनाचा यात समावेश आहे.
हडपसर न्युज ब्युरो