A special investigation is underway by the transport office against the backdrop of an increasing number of accidents involving electric bikes
इलेक्ट्रीक दुचाकींच्या वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर परिवहन कार्यालयातर्फे विशेष तपास मोहीम हाती
मुंबई : इलेक्ट्रीक दुचाकींच्या वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर परिवहन कार्यालयातर्फे या वाहनांच्या विशेष तपासणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. योग्य प्रमाणपत्राशिवाय सापडणारी आणि अवैधरित्या बदल केलेली इलेक्ट्रीक वाहनं या मोहिमेत जप्त केली जात आहेत.
कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेने दिलेल्या प्रमाणपत्राशिवाय इ वाहनांची निर्मिती करणारे उत्पादक आणि विक्री करणारे वितरक यांच्याविरोधात आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. २५० वॅट पेक्षा कमी क्षमता आणि २५ किलोमीटरपेक्षा कमी वेगाने धावणाऱ्या इ वाहनांना नोंदणीतून सवलत देण्यात आली असून ही सवलत मिळवण्यासाठी अनेक इ वाहनांमध्ये अनधिकृतरित्या बदल केले जात असल्याचं निदर्शनास आलं आहे.
चांगल्या दर्जेदार बॅटऱ्या काढून त्याजागी सुमार दर्जाच्या बॅटऱ्या बसवल्या जात असल्याचंही निदर्शनास येत आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांत इ वाहनांचे अपघात वाढत चालल्याचं दिसून आलं असून या वाहनांच्या दर्जाबद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
ही संभ्रमावस्था दूर करण्याच्या हेतूनेच परिवहन विभागाने आता ही धडक मोहीम हाती घेतली असून अवैधरित्या बदल केली गेलेली वाहने या मोहिमेत जप्त देखील केली जात आहेत.
हडपसर न्युज ब्युरो