Appeal to send application till 20th June for Marine Fisheries, Sailing Training
सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन प्रशिक्षणासाठी २० जूनपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन
मुंबई : मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीने या व्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थ्यांना सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन आणि सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन हे सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण देण्यात येते.
मुंबईतील वर्सोवा येथील प्रशिक्षण केंद्रात दिल्या जाणाऱ्या या प्रशिक्षणाच्या १२८ व्या सत्रासाठी इच्छुकांनी २० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी प्रदीप जगताप यांनी केले आहे.
वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२२ या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी सागरी मत्स्यवयवसाय, नौकानयन आणि सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षण केंद्रातून मत्स्यव्यवसाय नौकानयनाची मूलतत्त्वे, सागरी डिझेल इंजिनाच्या निरनिराळ्या भागाची माहिती व दुरुस्ती, मासेमारीची आधुनिक साधने, प्रात्याक्षिके आदींचे प्रशिक्षण दिले जाते. १२८ व्या प्रशिक्षण सत्रासाठी दारिद्र्यरेषेवरील प्रशिक्षणार्थ्यांकडून ४५० रुपये आणि दारिद्र्यरेषेखालील प्रशिक्षणार्थ्यांकडून १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
या प्रशिक्षणासाठी निकष निश्चित करण्यात आले आहेत, प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असावा, १८ ते ३५ वर्षे वयोगटातील असावा, पोहता येणे आवश्यक, किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण आवश्यक, मासेमारीचा किमान २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असून प्रशिक्षणार्थ्याकडे बायोमॅट्रिक कार्ड अथवा आधारकार्ड असणे आवश्यक आहे.
प्रशिक्षणासाठी विहित नमुन्यात परिपूर्ण अर्ज करताना त्या अर्जावर संबंधित मच्छिमार संस्थेची शिफारस असणे आवश्यक असून दारिद्र्यरेषेखालील प्रशिक्षणार्थी असल्यास अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्र, संबंधित गटविकास अधिकाऱ्याच्या दाखल्याची स्वाक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
निकषांची पूर्तता करणाऱ्या मच्छिमारी करणाऱ्या तरुणांनी आपल्या मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह विहित नमुन्यातील अर्ज मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मुंबई-६१ येथे २० जूनपर्यंत सादर करावेत. अधिक माहितीसाठी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी प्रदीप जगताप संपर्क क्र. ८७८८५५१९१६ आणि यांत्रिकी निर्देशक जयहिंद सूर्यवंशी – संपर्क क्र. ७५०७९८८५५२ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशिक्षण केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
हडपसर न्युज ब्युरो