Home Minister’s appeal to the citizens of the state to maintain peace and order
राज्यातल्या नागरिकांना शांतता आणि सुव्यवस्था पाळण्याचं गृहमंत्र्याचं आवाहन
मुंबई : राज्यातल्या सर्व नागरिकांनी शांतता पाळावी आणि कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेण्याचं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केलं आहे. भाजपाचे माजी प्रवक्ते नवीन जिंदाल आणि नुपूर शर्मा यांनी एका धर्मगुरुंविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं झालं. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
आंदोलनादरम्यान कुठलाही कटू प्रसंग घडला नाही, तसंच ते शांततापूर्ण मार्गानं व्हावं यासाठी सर्व धर्मीय जनतेनं दाखवलेल्या संयमाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. या आंदोलनाबाबत आपल्याला पूर्वसूचना होती अशी माहिती त्यांनी दिली.
नुपूर शर्मा यांच्या विरोधात राज्यात अनेक ठिकाणी तक्रार दाखल झाली असून त्यावर पोलीस योग्य ती कारवाई करतील. मात्र केंद्र सरकारनं देखील नुपूर शर्मा यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी असं ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, या दोघांच्या अटकेच्या मागणीसाठी सोलापूरात एका राजकीय पक्षानं मोर्चा काढला होता. त्यात नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
भाजपानं या दोघांविरोधात स्वतःहून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आंदोलन कर्त्यांनी यावेळी केली. परभणी इथंही आज जोरदार निषेध मोर्चा काढण्यात आला. औरंगाबाद इथं खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून निषेध वर्तवण्यात आला.
औरंगाबाद जिल्ह्यात आडुळ, बिडकीन, दौलताबाद इथं काही व्यावसायिकांनी आज बंद पाळला.
हडपसर न्युज ब्युरो