Inauguration of Vikrant Memorial at Regal Circle, Mumbai
मुंबईत रिगल सर्कल इथे विक्रांत स्मारकाचे उद्घाटन
मुंबई : आयएनएस विक्रांत या भारतीय नौदलाच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेची प्रतिकृती महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई शहराला समर्पित करण्यात आली. यावेळी व्हाईस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग -इन-चीफ, वेस्टर्न नेव्हल कमांड आणि इतर प्रतिष्ठित अतिथी उपस्थित होते.
विक्रांत युद्धनौकेची ही 10 मीटर लांब प्रतिकृती नेव्हल डॉकयार्ड, मुंबई यांनी यांनी बनवली आहे. कुलाब्यात रीगल सर्कल येथे रेसिडेंट्स असोसिएशन ‘माय ड्रीम कुलाबा’ आणि ‘सीएएलएम’ यांच्या संयुक्त विद्यमाने ती स्थानापन्न केली आहे. अॅड मकरंद नार्वेकर यांनी यासाठी सहकार्य केले आहे.
मुंबईच्या मजबूत सागरी संपर्काची आणि महाराष्ट्र राज्याच्या तितक्याच समृद्ध सागरी वारशाची ही प्रतिकृती साक्ष देत आहे. कुलाब्यातील प्रसिद्ध रीगल सर्कल येथे प्रतिष्ठित गेटवे ऑफ इंडिया आणि नेव्हल डॉकयार्डच्या खांद्याला खांदा लावून ही प्रतिकृती अभिमानाने उभी राहिली आहे. संपूर्ण सेवेदरम्यान मुंबई शहराशी असलेल्या तिच्या बंधाचे हे द्योतक आहे.
मॅजेस्टिक क्लासची विमानवाहू युद्धनौका, आयएनएस विक्रांतचे जलावतरण सप्टेंबर 1945 मध्ये झाले. 3 नोव्हेंबर 1961 रोजी मुंबई येथे औपचारिकपणे ती भारतीय नौदलात सामील झाली. या जहाजाने अनेक मोहिमा आणि युद्ध सरावांमध्ये भाग घेतला.
डिसेंबर 1961 मध्ये गोवा मुक्ती संग्राम आणि 1971 मधील भारत-पाकिस्तान युद्ध यांचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. देशाची 36 वर्षे सेवा केल्यानंतर, जानेवारी 1997 मध्ये ती निवृत्त झाली आणि 2012 पर्यंत मुंबई येथे तरंगते संग्रहालय म्हणून ती आकर्षणाचे केन्द्र ठरली.
‘नौदलाने दिलेल्या माहितीनुसार आयएनएस विक्रांत विमानवाहू युद्धनौका म्हणून नव्या रूपाने कोचीन शिपयार्ड येथे पुनश्च तयार होत आहे. लवकरच ही युद्धनौका आयएनएस विक्रांत याच नावाने नौदलात समाविष्ट केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
हडपसर न्युज ब्युरो