Savitribai Phule Pune University sub-center will be the pillar of the country
देशाचे आधारस्तंभ घडविण्याचे काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राद्वारे होणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचा भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रातून विविध प्रकारचे शिक्षण मिळणार आहे, या उपकेंद्राच्या माध्यमातून देशाचे आधारस्तंभ घडविण्याचे काम होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
आज दिंडोरी तालुक्यातील शिवनाई येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या नियोजित इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृष्यप्रणालीद्वारे संबोधित करत होते.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा पाया रचला आहे. या शिक्षणात बदलत्या काळानुसार नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होत असून या तंत्रज्ञानाचा वापर आपण आपल्या प्रगतीसाठी कसा करतो हे महत्वाचे आहे.
नाशिक उपकेंद्राच्या माध्यमातून साधारण दीड लाख विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ होणार आहे. तसेच या उपकेंद्रांची संख्या अजून वाढवून प्रत्येक घरात शिक्षण पोहचविण्याचे काम करणे अपेक्षित आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक शिक्षण मिळण्यासाठी संबंधित क्षेत्रातील माहिती असणे आवश्यक असते आणि माहितीचे रूपांतर ज्ञानार्जनात करण्याचे काम या नाशिक उपकेंद्रामार्फत होणार आहे.
शिक्षण विकासात प्रगल्भ भारत बनविण्याची ताकद – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार
स्वत: सोबत देशाचा विकास करून प्रगल्भ भारत बनविण्याची ताकद शिक्षण विकासात आहे. शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसून ती निरंतर चालणारी प्रक्रीया आहे. शिक्षणाच्या ज्योतीमुळे आयुष्यातील अज्ञानाचा अंधार दूर करून प्रत्येकाने पुढे जाणे आवश्यक आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून नाशिक उपकेंद्रामध्ये कौशल्य विकास अंतर्गत वाइनरी, पैठणी बनविणे अशा स्थानिक पातळीवर असणाऱ्या उद्योगांच्या प्रशिक्षणाची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.
जिल्हा नियोजनातून उपकेंद्राच्या सक्षमीकरणासाठी देणार पाच कोटी – पालकमंत्री छगन भुजबळ
उपकेंद्रांच्या मार्फत विद्यापीठांचे विकेंद्रीकरण होणे आवश्यक आहे. तसेच या उपकेंद्राच्या सक्षमीकरणासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. सामंत यांनी मागणी केल्याप्रमाणे पाच कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी दिली आहे.
या उपकेंद्रातून व्यावसायिक, औद्योगिक, संशोधनात्मक अशा विविध प्रकारच्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रासाठी शिवनाई गावाने जागा उपलब्ध करून दिली त्यासाठी पालकमंत्री यांनी सर्व गावकऱ्यांचे आभार व्यक्त केले. उपकेंद्र व शिवनाई गावासाठी वीज, रस्ते, पाणी यासारख्या आवश्यक सर्व मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासनही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिले आहे.
राज्य शासन सदैव विद्यार्थ्यांच्या पाठीशी : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
शिक्षणाला कौशल्यपूर्ण ज्ञानाची जोड देवून विद्यार्थ्यांना स्वबळावर आयुष्य जगण्यासाठी राज्य शासन सदैव विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे. एखादे कार्य यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे असते. त्याचप्रमाणे हे उपकेंद्र उभारण्यासाठी देखील लोकप्रतिनिधी व शासन यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
या उपकेंद्रात कौशल्य विकासाचा अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांना विविध उद्योगांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी या उपकेंद्राच्या सक्षमीकरणा करीता पालकमंत्री यांनी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची तंतोतंत अंमलबजावणी करणारे आपले पहिले राज्य आहे.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला पालकमंत्री छगन भुजबळ व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नाशिक उपकेंद्राच्या नियोजित इमारतीचे भूमीपूजन करून कोनशीलेचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगरु डॉ. कारभारी काळे यांनी प्रास्ताविकात नाशिक उपकेंद्राची व त्याअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली.
हडपसर न्युज ब्युरो