Under Agnipath Yojana, youngsters up to 23 years of age are eligible for Agniveer recruitment this year
अग्नीपथ योजनेअंतर्गत अग्नीवीर भरतीसाठी यंदा २३ वर्षांपर्यंतचे युवक पात्र
नवी दिल्ली : केन्द्र सरकारनं अग्निपथ योजनेच्या भरतीसाठीची वयोमर्यादा २१ वरून २३ वर्षापर्यंत वाढवली आहे. वयोमर्यादेची ही सूट केवळ या वर्षीच्या भरतीसाठी लागू राहणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
गेल्या दोन वर्षांदरम्यान भरती प्रक्रिया झाली नसल्यामुळं वयोमर्यादेचा हा निर्णय घेतला असल्याचं या मंत्रालयानं म्हटलं आहे.
अग्नीवीरांना केंद्रीय सशस्त्र पोलीस तसंच राज्य पोलिसांच्या भरतीमध्ये प्राधान्य दिलं जाणार असल्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे. त्याशिवाय उद्योजक बनण्याची इच्छा असणाऱ्या अग्निविरांना आर्थिक सहाय्य्य आणि बँक कर्जही दिली जाणार आहेत.
पुढलं शिक्षण घेता यावं म्हणून अग्निविरांना १२ वी शी समकक्ष असणारी प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. त्यामुळे लोकांनी अग्निविरांच्या भविष्याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन सरकारनं केलं आहे.
अग्निपथ योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं नुकतीच मंजुरी दिली असून या योजनेच्या माध्यमातून युवकांना सशस्त्र दलामध्ये ४ वर्षांची नोकरी दिली जाणार आहे. या योजनेंतर्गत चालू वर्षी ४६ हजार युवकांची भरती केली जाणार आहे. सशस्त्र दलांमध्ये युवकांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टीनं सरकारनं हे पाऊल उचललं आहे.
अग्निपथ योजनेंतर्गत भरती करण्यासाठी कमाल वयोमर्यादा वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयाचा युवकांना लाभ होईल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं गेली दोन वर्ष भरती प्रक्रिया ठप्प झाली होती. याचा विचार करून सरकारनं भरतीसाठीची वयोमर्यादा २१ वर्षांवरून २३ वर्षांपर्यंत वाढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचंही शाह यांनी स्पष्ट केलं आहे.
अग्नीपथ योजना सैन्य दलात भर्ती होऊ इच्छिणाऱ्या आणि देशसेवा करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी सुवर्णसंधी असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. यासाठी लष्करातली भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून इच्छुकांनी त्याच्या तयारीला लागावं असं आवाहन त्यांनी केलं.
अग्निपथ योजनेंतर्गत भरती करण्यासाठी कमाल वयोमर्यादा वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयाचा युवकांना लाभ होईल, असं लष्कर प्रमुख मनोज पांडे यांनी म्हटलं आहे. सरकारचा हा निर्णय कोरोनाच्या प्रादुर्भावाला न जुमानता भरती प्रक्रियेसाठीची तयारी सुरु ठेवणाऱ्या देशप्रेमी युवकांना संधी प्राप्त करून देईल असा विश्वास लष्कर प्रमुखांनी व्यक्त केला आहे.
भरती प्रक्रियेचं वेळापत्रक लवकरच घोषित केलं जाणार असल्याचं पांडे यांनी सांगितलं. अग्नीवीर म्हणून भारतीय लष्करात सामील होण्याच्या या संधीचा युवकांनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहनही पांडे यांनी केलं आहे.
हडपसर न्युज ब्युरो