Eknath Shinde group claims that 12 Shiv Sena MPs are with them
शिवसेनेचे १२ खासदार आपल्यासोबत असल्याचा एकनाथ शिंदे गटाचा दावा
नवी दिल्ली : शिवसेनेच्या १२ खासदारांनी आज एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्याची घोषणा केली. या १२ खासदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली, आणि गटनेता म्हणून राहुल शेवाळे, तर मुख्य प्रतोद म्हणून भावना गवळी यांची नेमणूक करण्याची विनंती केली.
मात्र यावर सभापतींनी अद्याप निर्णय घेतला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि या १२ खासदारांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषद घेतली. यावेळी शिंदे यांनी ही माहिती दिली. केंद्रीय मंत्रीमंडळात शिवसेनेचे खासदार सहभागी होणार का यासंदर्भात अजून चर्चा झाली नसल्याचं शिंदे म्हणाले.
शिवसेनेचे लोकसभा गटनेते विनायक राऊत यांच्याविषयी खासदारांमध्ये नाराजी होती. त्यांना बदलण्याची मागणी यापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती, असं राहुल शेवाळे यांनी यावेळी सांगितलं.
आज आम्ही केवळ गटनेता बदलला असून वेगळा पक्ष किंवा गट स्थापन केलेला नाही. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवायला शिवसेनेच्या खासदारांचा विरोध आहे. हे खासदार राष्ट्रीय लोकशाही आघाडीत जायला उत्सुक आहेत. अनेक वेळा हे उद्धव ठाकरे यांना कळवलं होतं, असंही शेवाळे म्हणाले.
स्वतः उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होण्याचे प्रयत्न केले होते. त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले नाही म्हणून त्यांनी आम्हाला प्रयत्न करायला सांगितलं होतं, असा दावाही शेवाळे यांनी केला.
NDA मध्ये सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली होती. मात्र विधीमंडळ अधिवेशनादरम्यान भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन झालं. त्यातच संजय राऊत यांनी वारंवार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू घेतली. त्यामुळं भाजप नाराज झाल्यानं, NDA त सहभागाच्या मुद्दा मागे पडला, असं शेवाळे म्हणाले.
संबंधित बातमी
शिवसेनेचे संसदीय गटनेते म्हणून राहुल शेवाळे यांची निवड
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com