बॉलिवूडचे ‘ट्रॅजेडी किंग’ ,दिलीपकुमार यांचे बुधवारी निधन.
दिलीपकुमार यांच्या बुधवारी निधनाने संपूर्ण भारतीय चित्रपट सृष्टीला हादरवून सोडले. वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झालेल्या दिग्गज अभिनेत्याने भविष्यात चित्रपट निर्माते आणि अभिनेते यांना शिकण्यासाठी, त्यांनी सिनेमातील दिलेले योगदान नेहमी प्रेरणादायी ठरे. अशा अभिनेत्याला बुधवारी सायंकाळी संपूर्ण राजकीय सन्मानाने मुंबईतील जुहू कबरस्तान येथे दफन करण्यात आले.
बॉलिवूडचा ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखले जात असे. पाच दशकांहून अधिक काळ कारकिर्दीत, विख्यात आख्यायिका हास्य, नाटक, प्रणय आणि इतर गोष्टींचा भाग होती.
त्याच्या काही प्रख्यात चित्रपटांमध्ये आन, दाग, देवदास, मधुमती, अजाद, मुगल-ए-आजम, गंगा जमुना, क्रांती, कर्मा, राम और श्याम यांचा समावेश आहे.
दिलीप कुमार यांना पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार निशान-ए-इम्तियाज हा एकमेव भारतीय प्राप्तकर्ता म्हणूनही मानले गेले.
सिनेमातील त्यांच्या योगदानाबद्दल दिलीपकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, कलाक्षेत्रातील भारताचा सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना पद्मविभूषण हा देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कारही मिळाला.
शाहरुख खानसमवेत, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीतील सर्वाधिक फिल्मफेअर पुरस्कार जिंकण्याचा विक्रम ८ वेळा केला त्याच श्रेणीतील १९५४ मध्ये त्याने उद्घाटन ट्रॉफीही जिंकली.
विविध मान्यवरांकडून अभिनेते दिलीप कुमार यांना श्रद्धांजली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी.
“मुगले आझम दोनदा पाहिला” : राज्यपाल कोश्यारी यांची दिलीप कुमार यांना श्रद्धांजली
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
दिलीप कुमार हे भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिले सुपरस्टार होते. चित्रपट सृष्टीच्या सुवर्ण काळातील ते नायक होते. दिलीप कुमार यांचा मुगले आझम मला इतका आवडला की मी लगोलग दोन वेळा पाहिला. परंतु त्यानंतर चित्रपट पाहणे झाले नाही, आणि मुगले आझम मी पाहिलेला पहिला आणि शेवटचा चित्रपट ठरला.
भारतीय चित्रपट सृष्टी आज जगात सर्वाधिक लोकप्रिय आहे. या यशाचे शिल्पकार जसे चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, गीतकार, संगीतकार व गायक आहे, तसेच दिलीप कुमार यांच्यासारखे सशक्त अभिनेते होते. दिलीप कुमार हे एक महान अभिनेते होते. त्यांची जागा कुणीही घेऊ शकणार नाही. माझ्याकरिता ते महानायक होते. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या पत्नी सायरा बानो व त्यांच्या असंख्य चाहत्यांना कळवतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना श्रद्धांजली
भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा, रूपेरी नभांगणातला एक लखलखता तारा निखळला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अजरामर भूमिका साकारणारे, दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामर राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, भारतीय चित्रपट सृष्टीच्या लौकिकात भर घालणारी, त्याला सातासमुद्रापार नेणारी अशी दिलीप कुमार यांची कारकिर्द आहे. त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिकांमधून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. नेहमीच्या जगण्यातही त्यांनी आपल्या व्यक्तीमत्त्वाप्रमाणे चित्रपटसृष्टीचा रूबाब वागवला आणि वाढवला. मेहनतीच्या जोरावर कला क्षेत्रात स्थान निर्माण करता येते, असा संदेश देणारी त्यांची वाटचाल होती. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचा स्नेहबंध होता. कला क्षेत्राविषयीची आत्मियता हा अतूट धागा या दोघांमध्ये होता. अजरामर भूमिका साकारणारे चतुरस्त्र अभिनेते दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामरच राहील. त्यांच्या निधनामुळे रूपेरी नभांगणातील एक लखलखता तारा निखळला आहे. ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
उपमुख्यमंत्री अजित पवार
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली.
“ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असून त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीचा दीपस्तंभ ढासळला आहे. अनेक पिढ्यांच्या, कोट्यवधी चित्रपटरसिकांच्या मनावर अधिराज्य करणारा ‘ट्रॅजेडीकिंग’ काळाच्या पडद्याआड गेला आहे. प्रत्येक अभिनेत्याचं ‘दिलीपकुमार’ बनण्याचं स्वप्न असायचं, ते स्वप्न दाखवणारा जादूगार आज स्वतःच अदृश्य झाला आहे. आभाळाएवढ्या उंचीच्या शतकातील या महान कलावंताला भावपूर्ण श्रद्धांजली.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ अभिनेते, पद्मविभूषण दिलीपकुमार यांचं स्मरण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख
आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून बॉलिवूडच नाही तर जगभरातील करोडो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ व दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे, त्यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान सदैव स्मरणात राहील, या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
शोकसंदेशात श्री. देशमुख यांनी म्हटले आहे की, 1944 मध्ये बॉम्बे टॉकिजची निर्मिती असलेल्या ‘ज्वार भाटा’ चित्रपटातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले, यानंतर दिलीप कुमार यांनी मागे वळून पाहिले नाही. आपल्या दर्जेदार अभिनयातून विविध अविस्मरणीय चित्रपट केले, त्यातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. बेस्ट ॲक्टरसाठी सर्वाधिक फिल्मफेअर अवॉर्ड जिंकण्याचे रेकॉर्डही दिलीपकुमार यांच्याच नावावर आहे.अंदाज, आण, दाग, देवदास, आझाद, मुघल ए आझम, गंगा जमुना, राम और शाम, क्रांती, शक्ती, मशाल, कर्मा, सौदागर यासारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या दिलीपकुमार यांनी केवळ अभिनयच केला नाही तर त्यांनी काही चित्रपटांची निर्मितीदेखील केली.
1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ‘मुगल-ए-आजम’ चित्रपटाने एक नवा रेकॉर्ड केला. एकापेक्षा एक सरस आणि दर्जेदार चित्रपटांतून अभिनय करणाऱ्या दिलीपकुमार यांचे चित्रपट सृष्टीतील योगदान हे अनन्यसाधारण असून त्यांचा अभिनय सदैव स्मरणात राहील, अशा भावना व्यक्त करून सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिलीपकुमार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.