Research in Ayurveda can achieve the welfare of mankind – Governor
आयुर्वेदातील संशोधनाने मानवजातीचे कल्याण साधता येईल –राज्यपाल
कार्ला येथील डॉ.बालाजी तांबे स्मारकाचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे : कार्ला येथील पद्मश्री श्रीगुरु डॉ.बालाजी तांबे स्मारकाचे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. ऋषीमुनींनी दिलेल्या आयुर्वेदातील ज्ञानाला संशोधनाद्वारे अधिक पुढे नेल्यास आयुर्वेद आणि आधुनिक उपचार पद्धतीत संतुलन स्थापित होत मानवजातीचे कल्याण साधता येईल, असे प्रतिपादन श्री.कोश्यारी यांनी यावेळी केले.
मावळ तालुक्यात कार्ला येथील आत्मसंतुलन व्हिलेज परिसरात आयोजित कार्यक्रमाला खासदार श्रीनिवास पाटील, श्रीरंग बारणे, सुनील तटकरे, बालाजी तांबे फाउंडेशनच्या अध्यक्षा वीणा तांबे, सुनिल तांबे, संजय तांबे, डॉ.मालविका तांबे आदी उपस्थित होते.
डॉ.बालाजी तांबे यांनी मानवजातीसाठी केलेले कार्य पुढे सुरू रहावे अशी अपेक्षा करून श्री.कोश्यारी म्हणाले, योग, ध्यान आदीसंबंधी भारतीय ज्ञान जाणून घेत आचरणात आणण्याचा प्रयत्न केल्यास मानवजीवन सुखकारक होईल. आपल्या देशाचे हे भाग्य आहे की नवा आजार समोर येताच त्यावर उपचार पद्धती विकसित झाली आहे. धन्वंतरीपासून सुरू झालेली परंपरा आजही कायम आहे.
भारतीय चिंतनाचे वेगळे महत्व आहे. इतर वैद्यकीय शाखा शरीराच्या आरोग्याचा विचार करतात, तर आयुर्वेद शरीरासोबत मानव जीवनाचा विचार करीत असल्याने त्याचे महत्व वेगळे आहे. उपचार आणि अध्यात्म याचा सुवर्ण संगम आयुर्वेदात आहे. जीवनात संतुलन असल्यास सर्व समस्यांवर मात करता येते. त्यामुळेच साधुसंतांनी स्वतःला ओळखण्याचा संदेश मानवजातीला दिला. या ज्ञानाची जोड देऊन आधुनिक उपचार पद्धतीदेखील अधिक प्रभावी होईल.
डॉ.बालाजी तांबे यांनी ही प्राचीन शिकवण अनुसरत आयुर्वेदाचे महत्व जगभरात पोहोचविले. या कार्याबद्दल समाज नेहमी त्यांचा ऋणी राहील. आयुर्वेद शरीरासोबत माणसाचा मानसिक आणि आध्यात्मिक विकास साधणारा असल्याचा संदेश डॉ.तांबे यांनी आपल्याला दिला आहे, असेही राज्यपाल म्हणाले.
खासदार पाटील म्हणाले, डॉ.बालाजी तांबे यांनी समाजाला आयुर्वेदाची मोठी देणगी दिली. त्यांचे स्मारक संतुलित जीवन जगण्याची प्रेरणा देईल.
खासदार बारणे म्हणाले, आयुर्वेदाच्या माध्यमातून माणसाला नवे जीवन देण्याचे कार्य डॉ. बालाजी तांबे यांनी केले. देशभरात कार्ला परिसराची ओळख आयुर्वेदासाठी आहे. हे कार्य पुढे सुरू रहावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिले.
खासदार तटकरे म्हणाले, डॉ.बालाजी तांबे यांनी भारतातील आयुर्वेद उपचार पद्धती श्रेष्ठ ठरू शकते हे सिद्ध करून दाखविले. नव्या आजारांवर संशोधन करण्याचे कार्य त्यांनी केले. हे संशोधन पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
यावेळी संजय तांबे यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. डॉ.मालविका तांबे यांनी बालाजी तांबे फाउंडेशनतर्फे चालविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com