CGST Bhiwandi Commissionerate arrests Rs. 132cr Fake Invoice racket mastermind
1 अब्ज 32 कोटी रुपयांचा बनावट इन्व्हॉईस गैरव्यवहार करणाऱ्या जाळ्याच्या सूत्रधाराला सीजीएसटी (केंद्रीय वस्तु सेवा कर) भिवंडी आयुक्तालयाने केली अटक
मुंबई : मुंबई विभागातल्या भिवंडीच्या केंद्रीय वस्तू सेवा कर आयुक्तालयाच्या ( CGST COMMISSIONRATE) अधिकाऱ्यांनी, बनावट इन्व्हॉईस म्हणजेच मालपुरवठा देयक यादी तयार करणारे जाळे उध्वस्त केले आहे. या जाळ्याच्या माध्यमातून 1अब्ज 32 कोटी रुपयांचे इन्व्हॉईस जारी केले गेले आहेत, तसेच 23 कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिटचा (मालखरेदी वरील करभरणा) गैरव्यवहार करण्यात आला आहे.
यासंदर्भात भिवंडीच्या केंद्रीय वस्तू सेवा कर आयुक्तालयाने 9 सप्टेंबर 2022 रोजी एका व्यक्तीला, या घोटाळ्याचा सूत्रधार म्हणून अटक केली असून त्याची 23 सप्टेंबर 2022 पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे
भिवंडीच्या केंद्रीय वस्तू सेवा कर आयुक्तालयाच्या कर चुकवेगिरी प्रतिबंधक पथकाने, मेक्टेक स्टील ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, यु.जी.एस.के. ट्रेडर, वर्ल्ड एंटरप्राईजेस, रोलेक्स एंटरप्राईजेस, एच.एच.टी. एंटरप्राइजेस, तसेच यश एंटरप्राइजेस यासारख्या बनावट कंपन्यांच्या केलेल्या चौकशी अंती, आरोपी आणि या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध आढळून आले.
मिळालेल्या विशिष्ट गुप्त महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारावर भिवंडीच्या केंद्रीय वस्तू सेवा कर आयुक्तालयाच्या कर चुकवेगिरी प्रतिबंधक पथकाने आरोपीच्या निवासस्थान आणि परिसराची झडती घेतली. हा आरोपी वस्तू सेवा कर घोटाळ्याच्या आठ प्रकरणांच्या चौकशीसाठी हवा होता.
या आरोपीने, या बनावट कंपन्यांची संकेतस्थळे निर्माण करून त्या संकेतस्थळांच्या माध्यमातून, कुठल्याही प्रकारचा माल आणि सेवा पुरवठा न करता, एक अब्ज 32 कोटी रुपयांची बनावट इन्व्हॉईस तयार केली आणि 23 कोटी 16 लाख रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा केला, असे तपासातून निष्पन्न झाले आहे.
36 बनावट केंद्रीय वस्तू सेवा कर कंपन्या स्थापन करून त्या माध्यमातून केंद्रीय वस्तू सेवा कर आयुक्तालयाच्या विविध विभागांमध्ये बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट गैरव्यवहार करण्याचे जाळे आपण निर्माण केल्याची कबुली देखील या आरोपीने दिली आहे.
तपासा दरम्यान मिळालेल्या परिस्थितीजन्य आणि वस्तुस्थितीदर्शक पुराव्यांच्या आधारावर, सदर आरोपीला 9 सप्टेंबर 2022 रोजी, केंद्रीय वस्तू सेवा कर कायदा 2017 च्या कलम 69 अंतर्गत, कायद्याच्या कलम 132 चे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली.
कर घोटाळा करणारे आणि बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट जाळे चालवणाऱ्यांविरुद्ध, मुंबईचा केंद्रीय वस्तू सेवा कर विभाग राबवत असलेल्या विशेष मोहिमेचा, ही कारवाई म्हणजे एक भाग आहे. भिवंडीच्या केंद्रीय वस्तू सेवा कर आयुक्तालयाने गेल्या एक वर्षात केलेली ही सतरावी अटक आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com