देशात शाश्वत शेतीसाठी कृषी उत्पादनांना योग्य भाव देणे आणि शेतकऱ्यांना वेळेवर किफायतशीर कर्जपुरवठा करणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती श्री. एम.वेंकैय्या नायडू यांनी केले.
येऊ घातलेल्या जागतिक अन्न संकटाविषयी संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेच्या (एफएओ) अहवालाचा हवाला देत ते म्हणाले की, जर आपण आपल्या शेतकर्यांना वेळेवर सहाय्य केले तर भारत केवळ स्वयंपूर्णच राहणार नाही तर येणाऱ्या काही वर्षांत जगाचीही भूक भागवतील.
महामारीमुळे निर्माण झालेल्या तीव्र संकटाला न जुमानता मागील वर्षी धान्य उत्पादनातील वाढीबद्दल आपल्या शेतकऱ्यांची प्रशंसा करत श्री नायडू म्हणाले की, शेती अधिक फायदेशीर होण्यासाठी साठवण क्षमता वाढविणे, पीक वाहतुकीवरील निर्बंध हटविणे आणि खाद्य प्रक्रियेला प्रोत्साहित करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
श्री नायडू पुढे म्हणाले की, “वाढत्या उत्पादनाबरोबरच खर्च कमी करण्यावरही शेतकऱ्यांनी भर दिला पाहिजे.पाणी आणि वीज यांसारख्या आपल्या स्रोतांचा अधिक चतुराईने उपयोग करणे देखील आवश्यक आहे”
हैदराबाद येथील डॉ मेरी चन्ना रेड्डी मनुष्यबळ विकास संस्था येथे माजी खासदार श्री. यालामांची सिवाजी लिखित ‘पल्लेकु पट्टाभिषेकम’ या पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर उपराष्ट्रपती म्हणाले की, गावे आणि शेती ही आंतरिकरित्या जोडली गेली आहेत आणि आपल्या गावांमध्ये ‘ग्राम स्वराज्य’ आणण्यासाठी आपल्याला गावांच्या समस्यांकडे समग्रपणे लक्ष दिले पाहिजे.