Clean, beautiful and garbage-free cities should be made a people’s movement — Chief Minister Eknath Shinde
स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त शहरे लोकचळवळ बनावी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.०चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ
शहर सौंदर्यीकरण व स्वच्छतेबाबत स्पर्धा घोषीत
मुंबई : स्वच्छता आणि स्वच्छता अभियानात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर असून आता स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त शहरे ही लोकचळवळ बनणे गरजेचे आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
यशवतंराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी (२.०) चा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर, आमदार प्रताप सरनाईक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, वाॅररूमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार उपस्थित होते.
यावेळी स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० – कचरामुक्त शहरे या तसेच घनकचरा आयसीटी या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत सहकार्य करणा-या संस्थांशी सहकार्य करारांची देवाण-घेवाणही यावेळी झाली. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत शहरांसाठी शहर सौदर्यीकरण व स्वच्छतेबाबत स्पर्धेची घोषणाही यावेळी करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयानेच गाव आणि शहरांचा विकास होतो हे आपण पाहिले आहे. महात्मा गांधीजींनी स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. गावागावांत स्वच्छतेचे महत्वाचे काम करणारे स्वच्छतादूत हेच महाराष्ट्राचे खरे ब्रँड अँबेसिडर आहेत. देशात स्वच्छतेची चळवळ आता रुजली आहे. या चळवळीत लोकसहभाग महत्त्वाचा ठरत असून इच्छाशक्ती द्वारेच ही कामे साध्य होऊ शकणार आहेत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० राज्यात सुरू होत आहे. या अभियानाद्वारे शहरे स्वच्छ व सुंदर आणि कचरामुक्त करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. यापुढील काळात सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यावरही भर द्यावा लागेल. याद्वारे महापालिकांना उत्पन्नही मिळू शकेल. नागपूर महापालिकेने यासंदर्भात सर्वोत्कृष्ट काम केले आहे.
सर्व प्रकारचा कचरा ही आता समस्या नसून हाच कचरा आता भांडवल ठरणार आहे. घनकचरा तसेच सर्वच प्रकारच्या कच-याच्या सुनियोजित व्यवस्थापनाव्दारे खत निर्मिती आणि अन्य बाबीही उत्पादित होऊ शकतात. उल्हासनगर महापालिकेने राबविलेला गटार स्वच्छतेसाठीचा रोबो प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरत आहे. यामुळे गटारांमध्ये उतरून स्वच्छता करणा-या कामगारांना दिलासा मिळत आहे. अश्याच प्रकारची नाविन्यपूर्ण कामे आणि उपक्रम स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० याअंतर्गत राबविण्यात यावीत. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० मधील कामे टिकाऊ आणि दर्जेदार पद्धतीचीच झाली पाहिजेत असेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.
90 दिवसात मुंबईचा कायापालट
येत्या 90 दिवसात मुंबईचा कायापालट करण्याचे अभियानही हाती घेण्यात आले आहे. यामध्ये मुंबई शहरातील पायाभूत सुविधांचा विकास करून शहराचा कायापालट करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबईत 450 रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येत असून लवकरच सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येईल. मुंबईतील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावरही विशेष भर देण्यात येत आहे असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
कचरामुक्तीव्दारे शहरांचा पूर्णपणे कायापालट करणारः- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शहरीकरण हा अभिशाप नसून शहरीकरणाचे आता सुनियोजित व्यवस्थापन करण्याची गरज आहे. शहरे ही विकासाची केंद्र असून शहरातच रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. स्वच्छतेत राज्य नेहमीच अग्रेसर असून महाराष्ट्र राज्य 2017 मध्ये हागणदारीमुक्त झाले. यापुढील काळात स्वच्छ आकांक्षी स्वच्छतागृहे परिवर्तन घडवून आणतील.
कचरा व्यवस्थापनात आता सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यावर भर द्यावा लागेल. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (शहरी) 2.0 अंतर्गत राज्यातील नागरी भागाचा कायापालट करण्यात येणार आहे. या टप्प्यात आता राज्यातील सर्व नागरी भागांचा समावेश असणार आहे. याव्दारे पूर्णपणे नगरोत्थान होईल. स्वच्छता अभियानात छोटी शहरेही चमकदार कामगिरी करत आहेत. या ब-याच शहरात घनकचरा व्यवस्थापन अतिशय व्यवस्थितपणे केले जाते.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (शहरी) 2.0 मध्ये लोकसहभाग मोठ्या प्रमाणावर असणे गरजेचे आहे. अभियानातील कामांमध्ये उत्तरदायित्व महत्त्वाचे ठरणार आहे. या अभियानात सर्वांनी अत्यंत तळमळीने काम करावे. कामात पारदर्शकता ठेवावी. आपल्याला उपयुक्त तंत्रज्ञान विकसित करण्यावर आणि वापरण्यावर भर द्यावा.
पीपीपी माॅडेलव्दारेही रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. यामध्ये खासगी संस्थांच्या सहभागावरही भर द्यावा लागेल. दोन वर्षांत आपल्याला शहरे कचरामुक्त करून शहरांचा पूर्णपणे कायापालट करायचा आहे. त्यादृष्टीने चांगल्या स्टार्टअप्सना यामध्ये नक्कीच संधी दिली जाईल असेही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले.
प्रास्ताविकात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी म्हणाल्या, स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी (२.०) अंतर्गत विविध उपक्रमांव्दारे कचरामुक्त शहरांकडे वाटचाल करायची आहे. महाराष्ट्र २०१७ मध्ये हागणदारीमुक्त झाला. नवीन टप्प्यांमध्ये वैयक्तिक शौचालये, सार्वजनिक शौचालये, आकांक्षी सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहेत. याबरोबरच घनकचरा व्यवस्थापन, जुन्या साठलेल्या कच-यावर प्रक्रिया करणे व क्षमताबांधणीचे उपक्रमही घेण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री कार्यालयातील वाॅररूमचे महासंचालक राधेशाम मोपलवार यांनी वाॅररूमबद्दल माहिती दिली. श्री मोपलवार म्हणाले, मुख्यमंत्री कार्यालयातील वाॅररूमव्दारे महत्वाच्या योजना, प्रकल्प यासंदर्भात धोरणात्मक विचार व समन्वयन करण्यात येते.
नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक किरण कुलकर्णी यांनी आभारप्रदर्शन केले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com