Two Naxalites arrested in Gadchiroli district
गडचिरोली जिल्ह्यात दोन जहाल नक्षल्यांना अटक
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळ बळकट करण्याच्या हेतूने रेकी करण्यासाठी आलेल्या दोन जहाल नक्षल्यांना पोलिसांनी धानोरा तालुक्याच्या मोरचूल परिसरातून अटक केली आहे.
सनिराम उर्फ शंकर उर्फ कृष्णा शामलाल नरोटे, आणि समुराम उर्फ सूर्या घसेन नरोटे अशी या नक्षल्यांची नावं असून, दोघेही मोरचूल गावचे रहिवासी आहेत. सनिराम नरोटे २०१५ मध्ये टिपागड दलमध्ये भरती झाला. शासनाने त्याच्यावर ८ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
समुराम नरोटे हा नक्षल्यांच्या जनमिलिशियाचा सदस्य होता. त्याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस होते. या दोघांवरही खून, जाळपोळ, चकमक असे अनेक गुन्हे दाखल होते, अशी माहिती पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली. ऑक्टोबर २०२० पासून आतापर्यंत २० नक्षल्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
सद्य:स्थितीत उत्तर गडचिरोलीत नक्षल चळवळ संपुष्टात आली आहे. टिपागड आणि चातगाव दलम जवळपास संपलेले आहेत. त्याअनुषंगाने अबुझमाडमधील नक्षल्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी या दोघांसह काही जणांना रेकी करण्यासाठी उत्तर गडचिरोलीत पाठविले होते. या भागात नक्षल चळवळ बळकट करण्यासाठी वाव आहे काय, लोकांचा प्रतिसाद कसा मिळू शकतो याविषयी ते पडताळणी करीत होते. मात्र, तत्पूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com