Reading Inspiration Day at Savitribai Phule Pune University
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वाचन प्रेरणा दिन
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत मुक्त संवाद..!!
उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन साजरा होणार
पुणे : देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन व उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत मुक्त संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर ज्ञानस्रोत केंद्र येथे दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने जयकर ज्ञानस्त्रोत केंद्रातील स्वातंत्र्यविषयक ग्रंथ व स्वातंत्र्योत्तर राष्ट्रपती व पंतप्रधान यांची चरित्रे, स्वतंत्र भारताच्या प्रगतीचे विविध शिल्पकार यांची चरित्रे, ग्रंथालयातील रत्ने यांचे प्रातिनिधिक प्रदर्शन दिनांक १५ ऑक्टोबर २२ रोजी व दिनांक १७ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालिका डॉ.अपर्णा राजेंद्र यांनी दिली. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.
या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज माने, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, जयकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालिका डॉ.अपर्णा राजेंद्र आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ग्रंथालयाची स्थापना ही १९५० साली झाली. पुढे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅरिस्टर डॉ.मु.रा. जयकर यांचे नाव या ग्रंथालयास देण्यात आले.
२०१७ साली जयकर ज्ञानस्रोत केंद्र असे याचे नामकरण करण्यात आले. छापील ग्रंथ, छापील नियतकालिके, छापील प्रबंध, हस्तलिखिते, नकाशे तसेच ई डेटाबेसेस, ई नियतकालिके, ई ग्रंथ, सांगीतिक ठेवा, फोटो, यासारखे विविध ज्ञानस्त्रोत संग्रही आहेत. आजमितीला ग्रंथालयात साडे चार लाखाहून अधिक छापील ग्रंथ, नियतकालिकांचे बांधीव खंड, संशोधन प्रबंध आदिंचा समावेश आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com