Book exhibition in Sadhana Vidyalaya on the occasion of ‘Vachan Prerna Divas’
वाचनप्रेरणा दिनानिमित्त साधना विद्यालयात ग्रंथदिंडी व ग्रंथप्रदर्शन
माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस दि. 15 ऑक्टोबर हा ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा
हडपसर : वाचनामुळे माणसाचे विचार प्रगल्भ होतात. व्यक्तिमत्त्व घडते व जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळते.’वाचाल तर वाचाल’ या उक्तीप्रमाणे जीवनात वाचन महत्त्वाचे असते. त्यामुळे प्रत्येकाने अवांतर वाचन करावे व ज्ञानसमृद्ध व्हावे असे प्रतिपादन साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.
भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती व जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ भारतरत्न डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 15 ऑक्टोबर हा दिवस वाचनप्रेरणा दिन साजरा करण्यात येतो. रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयात वाचनप्रेरणा दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन व ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. वर्तमानपत्र पत्रांचे सामूहिक वाचन घेण्यात आले. वृत्तपत्र विक्रेता दिन देखील साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे आजीव सभासद व आजीव सभासद बोर्डाचे सचिव विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव ,उपमुख्याध्यापिका योजना निकम,
पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,ग्रंथालय प्रमुख प्रदीप बागल व सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले.
माळवाडी परिसरात ग्रंथदिंडी काढून वाचनाविषयी जागृती करण्यात आली.शालेय वयातच विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी विद्यालयात ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यानिमित्ताने कथा,कादंबरी,नाटक,ऐतिहासिक, सांस्कृतिक,बालसाहित्य,वैज्ञानिक व मूल्यशिक्षण,आरोग्य अशा विविध विषयांवर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन भरवणयात आले होते. 5 वी ते 10 अखेर 5000 विद्यार्थी व शिक्षकांनी ग्रंथप्रदर्शन पाहिले. वाचनप्रेरणादिनानिमित्त अमोल जाधव या वर्तमानपत्र विक्रेत्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने अनिल वाव्हळ व ज्ञानेश्वर सरोदे यांनी वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. पल्लवी कुंभार यांनी ‘वाचा रे वाचा ‘या गीतातून वाचनाचे महत्त्व सांगितले. यानिमित्ताने लालासाहेब खलाटे यांनी वाचन प्रतिज्ञा विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतली.
कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव ,उपमुख्याध्यापिका योजना निकम,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,आजीव सभासद लालासाहेब खलाटे,ग्रंथालय प्रमुख प्रदीप बागल ,आजीव सेवक अनिल मेमाणे,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक शिवाजी मोहिते यानी केले.सूत्रसंचालन संगिता रूपनवर व रूपाली सोनावळे यांनी केले.तर आभार सविता पाषाणकर यांनी मानले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com