Provide facilities to devotees at places of pilgrimage – Guardian Minister Chandrakantada Patil
भाविकांना तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी सुविधा द्या- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
पुणे : तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी सरकारचे प्राधान्य असून भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासाठी विकास आराखड्याव्यतिरिक्त इतर विकासकामांसाठीचा स्वतंत्र प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.
पालखीतळ/मार्ग विकास आराखड्यातील पुणे जिल्ह्यातील देहू, आळंदी, भंडारा डोंगर व सुदुंबरे विकास आराखडा कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
बैठकीस आमदार राहुल कुल, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.पाटील यांनी तिर्थस्थळाच्या परिसरातील नवीन रस्ते, पुल,भक्तनिवास बांधकाम, घाट बांधकाम, मल:निःसारण, स्वच्छतागृहे आदी कामांचा आढावा घेतला.
श्री. पाटील म्हणाले, तीर्थक्षेत्रांच्या विकासाला शासनाने प्राधान्य दिले असून भाविकांच्या गरजा लक्षात घेऊन विकासकामांचे प्रस्ताव सादर करावेत. देहू येथे पूर्ण झालेली कामे स्थानिक स्वराज्य संस्थेकडे हस्तांतरित करण्यात यावी. तिर्थस्थळाच्या ठिकाणी स्वच्छता राहील आणि भाविकांना असुविधा होणार नाही याची दक्षता घ्यावी व त्यासाठी आवश्यक कामे प्रस्तावित करावी.
पुणे जिल्हा परिषद अंतर्गत चांगली कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासक आयुष प्रसाद यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सर्व विभाग आणि पंचायत समित्यांच्या कामगिरीचा अहवाल यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सादर केला. आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत चांगल्या कामगिरीसाठी आरोग्य विभागाला सर्वोत्कृष्ट विभाग तर मावळला सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रे आणि रुग्णवाहिकांसाठी उपकरणे खरेदी करून पायाभूत सुविधांचे बळकटीकरण आणि पथकांकडून तपासणी करून चांगली कामगिरी केली आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com