Lt Gen Ajay Kumar Singh assumed charge of Southern Command, Pune
अति विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, सेना पदक, विशेष सेवा पदक विजेते लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांनी सदर्न कमांड, पुणे येथील पदभार स्वीकारला
पुणे : अतिविशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेवा पदक विजेते लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांनी 01 नोव्हेंबर 2022 रोजी भारतीय सैन्याच्या सदर्न कमांडचा पदभार स्वीकारला.
लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग हे राष्ट्रीय सुरक्षा अकादमी, पुणे आणि भारतीय सैनिक अकादमी, डेहराडूनचे माजी विद्यार्थी आहेत. तसेच ते डिसेंबर 1984 मध्ये 7/11 गोरखा रायफल्समध्ये जनरल ऑफिसर पदी नियुक्त झाले होते.
सिंग यांना सर्व प्रकारच्या भूप्रदेशात काम करण्याचा दांडगा अनुभव आहे मग ते दहशतवादप्रवण क्षेत्र असो की आणि उंचावरील सीमाभाग, बर्फाळ प्रदेश असो किंवा सियाचीनचा हिमाच्छादित प्रदेश अथवा वाळवंटी सीमाक्षेत्र. त्यांनी जम्मू काश्मीर मधील नियंत्रण रेषेवर 1/11 गोरखा रायफल्स, वेस्टर्न थिएटरमधील एक एलिट ब्रिगेड, काश्मीर खोऱ्यातील एक फ्रंटलाइन काउंटर इन्सर्जन्सी फोर्स आणि ईशान्येकडील त्रिशक्ती कोअरचे नेतृत्व केले आहे.
जनरल ऑफिसर सिंग यांनी प्रमुख निर्देशात्मक आणि कर्मचारी पदांवर देखील काम केले आहे, ज्यात कमांडो विंग, बेळगाव येथील प्रशिक्षक, लष्करी ऑपरेशन्सचे अतिरिक्त महासंचालक आणि संरक्षण मंत्रालय (लष्कर), नवी दिल्लीच्या एकात्मिक मुख्यालयात महासंचालक (ऑपरेशनल लॉजिस्टिक आणि स्ट्रॅटेजिक मुव्हमेंट) या पदांचा समावेश आहे. नेपाळमधील भारतीय दूतावासात, पीपीओ धरान येथे प्रभारी अधिकारी म्हणून काम करून राजनैतिक मुत्सद्दी सैनिकाची भूमिका देखील बजावली आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पुण्यातील सदर्न कमांड युद्ध स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना आदरांजली वाहिली.
निवृत्त होत असलेले आर्मी कमांडर तसेच परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, सेना पदक विजेते लेफ्टनंट जनरल जे.एस. नैन यांनी अत्यंत आव्हानात्मक वातावरणात नेमून दिलेली कामे पूर्ण करण्यासाठी कमांडच्या सर्व श्रेण्यांचे त्यांची अतुलनीय बांधिलकी, समर्पण आणि निष्ठेबद्दल कौतुक केले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com