केंदूर पाबळ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन

Guardian Minister Chandrakant Patil पालकमंत्री चंद्रकांत पाटील मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Kendur Pabal Regional Water Supply Scheme Guardian Minister Chandrakant Patil performed Bhumi Pujan

केंदूर पाबळ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

येत्या २५ वर्षासाठी पाणी पुरवठा योजना उपयुक्त ठरणार-पालकमंत्री

पुणे : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जल जीवन मोहिमेअंतर्गत शिरुर तालुक्यातील केंदूर पाबळ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले.

Guardian Minister Chandrakant Patil पालकमंत्री चंद्रकांत पाटील मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
File Photo

या योजनेत भविष्यातील लोकसंख्या वाढीचा विचार केला असल्याने ग्रामस्थांनी योजनेची देखभाल नीट ठेवल्यास येत्या २५ वर्षातील वाढत्या लोकसंख्येसाठी ही योजना उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाला खासदार श्रीकांत शिंदे, आमदार दिलीप वळसे पाटील, मेघना बोर्डीकर, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, पोपटराव गावडे, सुर्यकांत पलांडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या. त्यामुळे नागरिकांपर्यंत घर, शौचालय, गॅस, वीज अशा सुविधा पोहोचल्या. दुर्गम भागातील महिलांना दुरवरून पाणी आणावे लागते. त्यांचे श्रम कमी करण्यासाठी ७० हजार कोटींची ‘हर घर नल योजना’ सुरू करण्यात आली आहे.

योजनेत सौर ऊर्जेचा उपयोग करण्यात येणार असल्याने ही योजना अधिक उपयुक्त ठरेल. केंदूर पाबळ प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ११ गावे आणि ३१ वाड्यांना उपयुक्त ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले.

केंदूर गावाला तीर्थस्थळ विकासासाठी गरज लक्षात घेऊन निधी देण्यात येईल. गावाच्या शेतीसाठी पाणी मिळण्याबाबत आढावा घेऊन सहकार्य करण्यात येईल. जिल्ह्याच्या विकासासाठी तालुकानिहाय आठवड्यात एक तालुक्यातील गावांच्या विकासाबाबत आढावा घेण्यात येईल, असेही श्री.पाटील यांनी सांगितले.

खासदार शिंदे म्हणाले, प्रत्येकाच्या घरापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी जल जीवन मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी ५० टक्के खर्च राज्य आणि ५० टक्के केंद्र सरकार करणार आहे. महिलांचा त्रास कमी करण्यासाठी जल जीवन मोहिम उपयुक्त ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाने जनकल्याणाचे अनेक महत्वाचे निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार वळसे पाटील म्हणाले, गावाच्या विस्तारानुसार पायाभूत सुविधांचा विकास होणे गरजेचे आहे. केंद्र व राज्य सरकारने योजनेला निधी दिल्याने केंदूर पाबळ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू होत आहे. आमदार श्रीमती बोर्डीकर आणि माजी खासदार पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

अशी आहे केंदूर पाबळ प्रादेशिक पाणी पुरवठा योजना

जल जीवन मोहिमेअंतर्गत केंदूर पाबळ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये केंदूर, महादेववाडी, पऱ्हाडवाडी, सुक्रेवाडी, थिटेवाडी, पाबळ, चौधरीबेंद, फुटाणेवाडी-आखरमाळ,माळवाडी-आगरकरवाडी, थापेवाडी-पिंपळवाडी, झोडगेवाडी या ११ गावासोबतच ३१ वाड्यांतील २० हजारपेक्षा जास्त नागरिकांना या योजनेचा फायदा होणार आहे. योजनेच्या कामासाठी ५९ कोटी ४५ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

खेड तालुक्यातील चिंचोशी गावाच्या हद्दीतील चासकमान उजवा कालवा येथून उताराने कालव्याशेजारी बांधण्यात येणाऱ्या जॅकवेलमध्ये पाणी घेण्यात येणार आहे. त्यांनतर ४०० मीमी व्यास असलेल्या ५.७७५ किमी लांबीच्या पाईपलाईनद्वारे व १५० अश्वशक्ती क्षमता असलेल्या २ व्ही.टी. पंपाच्या सह्यायाने पाणी केंदूर गावाच्या हद्दीतील नव्याने बांधण्यात येणाऱ्या आरसीसी तलावापर्यंत पोहचविण्यात येणार येणार आहे.

जलशुद्धीकरणासाठी ३ दशलक्ष लिटर पाणी जलशुद्धीकरण केंद्र आणि १२६.७५ दशलक्ष लिटर आरसीसी साठवणूक क्षमतेचे तलाव तयार करण्यात येणार आहे. ५५ किलोमीटरच्या पाईपलाईनद्वारे पाणी सर्व गावांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. याशिवाय जलशुद्धीकरण केंद्राजवळ एक मुख्य संतुलन टाकी तसेच केंदूर गावातील ठाकरवाडी व सुक्रेवाडी येथे दोन टाक्या उभारण्यात येणार आहे. योजना पूर्ण झाल्यावर परिसरातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *