Uddhav Thackeray’s demand that the Central Investigation Agency should be dismantled
केंद्रीय तपास यंत्रणा लौकरात लौकर मोडीत काढाव्या अशी उद्धव ठाकरे यांची मागणी
मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर प्रादेशिक पक्षांना कमकुवत करण्यासाठी केला जात असून त्या लौकरात लौकर मोडीत काढल्या जाव्या अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ प्रकरणी पीएमएलए न्यायालयानं जामीन मंजूर केल्यानंतर आज त्यांच्यासोबत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सक्तवसुली संचालनालयाचा गैरवापर होत असल्याचं निरीक्षण न्यायालयानंही नोंदवलं असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
यावेळी त्यांनी ईडीसह तपास यंत्रणांवर हल्लाबोल केला. केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून अनेक पक्ष फोडले गेले, अनेक पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. बेकायदेशीर अटक केली जात आहे. खोटे गुन्हे दाखल केले जात आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी कोर्टाचे आभार मानले. कोर्टाने ईडीच्या प्रकरणात काही निरीक्षणे नोंदवली आहेत. त्याचंही त्यांनी आभार मानले. यावेळी त्यांनी तपास यंत्रणांचे वाभाडे काढतानाच या यंत्रणांना पाळीव प्राण्यांची उपमा दिली.
तुरुंग प्रशासन आणि इतर महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.
तुरुंगातले आपले अनुभव शब्दबद्ध केले असून लौकरच ते प्रकाशित करु असं ते म्हणाले.
दरम्यान, राऊत यांच्या जामिनाला आव्हान देणाऱ्या ईडीच्या याचिकेवरची सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयानं पुढं ढकलली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com