Congress criticizes that the Modi government is taking away the rights of tribal’s to water, forest and land
आदिवासींच्या जल, जंगल, जमिनीचे हक्क मोदी सरकार हिरावून घेत असल्याची काँग्रेसची टीका
वाशिम: आदिवासींच्या जल, जंगल, जमिनीचे हक्क मोदी सरकार हिरावून घेत असल्याची टीका काँग्रेस महासमितीच्या प्रसारमाध्यम विभागाचे अध्यक्ष जयराम रमेश यांनी केली आहे. ते आज भारत जोडो यात्रेदरम्यान, वाशिम इथं बातमीदारांशी बोलत होते.
आदिवासींच्या हक्क आणि अधिकारासाठी आदिवासांचे जननायक बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांविरोधात मोठा संघर्ष केला. बिरसा मुंडा यांची आज १२२ वी जयंती आहे. पण आताही आदिवासींना त्यांचे हक्क मिळू दिले जात नाहीत.
काँग्रेस सरकारनं आदिवासींच्या हिताचे निर्णय घेतले होते, वन अधिकार अधिनियम २००६ आणि भूमी अधिग्रहण कायदा २०१३ यातून त्यांना हक्क मिळाले होते, पण मोदी सरकार आल्यापासून हे कायदे कमजोर करण्यात आलेत. आदिवासींची जमीन बड्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचं काम केलं जात आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या प्रकरणात लक्ष घालतील, अशी अपेक्षा जयराम रमेश यांनी व्यक्त केली.
भारताच्या इतिहासात पहिल्यांदा काँग्रेसनं गडचिरोली जिल्ह्यातल्या मेंडालेखा गावात एका बांबू व्यापारावरचं नियंत्रण ग्रामसभेला देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. पण त्यानंतर आलेल्या भाजपाच्या फडणवीस सरकारनं हा निर्णय फिरवला, आणि पुन्हा हे अधिकार वन विभागाला दिले, असं ते म्हणाले.
भारत जोडो यात्रेचा आजचा ६९ वा दिवस आहे. या पदयात्रेत लोकांचा सहभाग दररोज वाढत आहे. त्यातही महिलांचा या पदयात्रेतला सहभाग हा लक्षणीय आहे, असं जयराम रमेश यांनी सांगितलं.
यात्रेत सहभागी झालेल्या काँग्रेसच्या महिल्या नेत्यांनी आपले अनुभव यावेळी व्यक्त केले. माजी मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या या पदयात्रेतून एक सकारात्मक उर्जा निर्माण होत आहे, ही उर्जा माणसांना तसंच देशाला जोडण्याचं काम करत आहे.
प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या की, ही पदयात्रा मानवतेची यात्रा असून महिलांचा सहभाग आनंद देणारा आहे. पदयात्रेत महिला मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. काँग्रेस पक्ष हा महिलांचे हित जोपासणारा पक्ष आहे.
आ. डॉ. प्रज्ञा सातव म्हणाल्या की, भारत जोडो यात्रेत महिलांचा सहभाग मोठा आहे. महागाईचा मुद्दा हा महिलांचा अत्यंत जवळचा मुद्दा आहे. ४०० रुपयाचा स्वयंपाकाचा गॅस आज १२०० रुपये झाला आहे पण त्याविरोधात भाजपाचा एकही नेता तोंड उघडत नाही. काँग्रेस सरकार असताना ४०० रुपयांचा गॅस त्यांना महाग वाटत असे व मोदी, स्मृती इराणींसह अनेक नेते रस्त्यावर उतरून आवाज उठवत होते पण आज गॅस १२०० रुपयांचा झाला तरी मोदींना महिलांना होणारा त्रास दिसत नाही. भारत जोडो यात्रेत महिलांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडले जात आहेत, त्याला वाचा फोडली जात आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com