Rashtriya ‘Shilp’ Award given to three artisans from Maharashtra
महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय ‘शिल्प’ पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय ‘शिल्प’ पुरस्काराने केंद्रीय वस्त्र मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले.
येथील विज्ञान भवनात केंद्रीय वस्त्र मंत्रालयाच्यावतीने वर्ष 2017, 2018, आणि 2019 साठीचे ‘शिल्प गुरू पुरस्कार’ आणि ‘राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, केंद्रीय वस्त्र मंत्री श्री गोयल, केंद्रीय वस्त्र सचिव रचना शहा, हस्तकला विकास आयुक्त व्यासपीठावर उपस्थित होते. उपराष्ट्रपती यांच्या हस्ते ‘शिल्प गुरू’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय ‘शिल्प’ पुरस्कार केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
‘शिल्प गुरू’ पुरस्काराचे स्वरूप सुवर्ण पदक ताम्रपत्र आणि दोन लाख रूपये रोख असे आहे. तर, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त हस्त शिल्पकारांना ताम्रपत्र आणि 1 लाख रूपये रोख असे पुरस्कारास्वरूप प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकार सन्मानित
कोल्हापूरचे अमर सातपुते यांना चामडयापासून कोल्हापूरी चपला हाताने बनविण्याच्या कारीगिरीसाठी आज राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. श्री. सातपुते यांना वर्ष 2019 साठीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री. सातपुतेंचा चामडयापासून चपला बनविण्याचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे.
श्री अमर सातपुते हे या व्यवसायात वर्ष 2005 पासून स्वच्छेने काम करीत आहेत. वडीलांकडून त्यांनी चपला बनविण्याचे बारकावे शिकल्याचे श्री. अमर यांनी पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर सांगितले. हस्तकला विभागाकडून महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी प्रदर्शन निमित्त स्टॉल लावण्याची संधी मिळते. यातून आणखी काही कल्पना सुचत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यवतमाळच्या रजनी शिर्के यांना भरतकाम हस्तकलेसाठी वर्ष 2019 च्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती शिर्के यांनी 32 वर्षांपूर्वी मध्यप्रदेशातून विशेष भरतकामाचे प्रशिक्षण घेतले. सध्या त्या यवतमाळ आणि परिसरात बचत गटांतील मुलींना- महिलांना भरतकाम शिकवित असल्याचे पुरस्कार प्राप्त केल्यानंतर सांगितले.
अभय पंडित यांना कुंभार कामांसाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री पंडित यांना वर्ष 2018 च्या राष्ट्रीय हस्त शिल्प पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com