रस्त्यावरील जीवीत व वित्त हानी टाळण्यासाठी विविध उपाययोजना

Various measures to avoid loss of life and finances on the road

रस्त्यावरील जीवीत व वित्त हानी टाळण्यासाठी विविध उपाययोजना

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर १ डिसेंबरपासून रस्ता ‘सुरक्षा’ उपक्रम

रस्ता सुरक्षा जनजागृती व अंमलबजावणी उपक्रमांतर्गत दोन्ही महामार्गावर विविध उपाययोजना राबवण्यात येणार

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती नवीन व जुन्या महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी करणे, वाहन चालकांमध्ये शिस्त निर्माण व्हावी यासाठी १ डिसेंबर पासून पुढील ६ महिन्यांसाठी २४ तास ‘सुरक्षा’ या रस्ता सुरक्षा जनजागृती व अंमलबजावणी उपक्रमाचे आयोजन परिवहन विभागामार्फत करण्यात येत आहे.

Image by https://www.godigit.com/traffic-rules/road-safety-rules-in-india

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत १७ ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीत रस्त्यावरील जीवीत व वित्त हानी टाळण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणण्यासाठी सर्व संबंधित विभागांना आदेश देण्यात आले होते.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच जुना महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी करणे व वाहन चालकांमध्ये शिस्त निर्माण होण्याकरीता दीर्घकालीन जनजागृती व अंमलबजावणी करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले होते.

त्यानुसार परिवहन विभागाने ‘सुरक्षा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमासाठी मोटार वाहन विभागातील मुंबई, पुणे, पनवेल, पिंपरी चिंचवड या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांची एकूण १२ पथकांची निर्मिती करण्यात आलेली असून त्या प्रत्येक पथकात ३० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही महामार्गावर यामधील प्रत्येकी ६ पथके व १५ अधिकारी २४ तास कार्यरत राहणार आहेत.

रस्ता सुरक्षा जनजागृती व अंमलबजावणी उपक्रमांतर्गत दोन्ही महामार्गावर विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत अपघातग्रस्त ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) तसेच अपघाप प्रवण ठिकाणांचे सर्वेक्षण करणे, त्याठिकाणी रस्ता सुरक्षेच्या हेतूने सर्व उपाययोजना करणे आणि वाहन चालकांच्या माहितीकरीता त्याठिकाणी घडलेल्या अपघातांची माहिती देणारे फलक प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

अवैधरित्या रस्त्यावर पार्किंग करणाऱ्या वाहनांवर तात्काळ कारवाई करणे आणि रस्त्यावर वाहतुकीसाठी निर्माण झालेले अडथळे दूर करणे. दोन्ही महामार्गावरील टोल नाक्यावर उद्घोषणा करुन जनजागृती करणे. इंटरसेप्टर वाहनांच्या माध्यमातून अतिवेगाने चालणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे. उजव्या मार्गिकेत ट्रक, बस, कंटेनर आदी कमी वेगाने चालणारी वाहने, चुकीच्या पद्धतीने मार्गिका बदलणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे. विना हेल्मेट, विना सिटबेल्ट प्रवास करणाऱ्या चालकांवर आणि प्रवाशांवर कारवाई करणे आदी उपाययोजना या उपक्रमाअंतर्गत करण्यात येणार आहे.

रस्ता सुरक्षा निर्माण करण्याच्या हेतूने ‘सुरक्षा’ हा उपक्रम प्रथमच परिवहन विभागामार्फत राज्यात सहा महिन्यांच्या कालावधीकरीता सुरु करण्यात आलेला आहे.

या उपक्रमांतर्गत पहिले ७ दिवस दोन्ही महामार्गावरील महामवरील टोल नाक्यावर व वाहनांवरील पीए प्रणालीमार्फत जनजागृती व उद्घोषणा करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व वाहतुक नियमांचे पालन करण्याच्या हेतूने कारवाई करुन अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस विभाग, महामार्ग पोलीस, स्वयंसेवी संस्था आदींचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

रस्त्यावरील अपघातांचे शास्त्रीय विश्लेषण केले असता त्यामध्ये ८० टक्के पेक्षा जास्त अपघात हे चालकांचा निष्काळजीपणा, बेफिकीर वृत्ती व वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे होत असल्याचे दिसून आले असून चालक व नागरिकांनी वाहन चालवतांना नियमांचे पालन करण्यासाठी करण्याचे आवाहन राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी केले आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *