The innovative course was launched by Skill Development Minister Mangal Prabhat Lodha
अभिनव अभ्यासक्रमाचा कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते प्रारंभ
महिलांसाठी आता गॅस स्टेशन, पेट्रोल पंप सेवकाचे प्रशिक्षण
मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व रेवती रॉय फाऊंडेशन यांच्यामार्फत महिलांसाठी ‘गॅस स्टेशन, पेट्रोल पंप सेवक’ या अभिनव अभ्यासक्रमाचा नुकताच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
यातून प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना थेट गॅस स्टेशन, पेट्रोल पंप येथे रोजगार उपलब्ध होईल. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत 100 महिला लाभार्थींना प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षणाचा कालावधी 7 दिवसांचा असून संस्थेमार्फत 90 दिवसांचे ऑन जॉब ट्रेनिंगही देण्यात येईल.
प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना मासिक 12 ते 15 हजार रुपये वेतनावर भारत सरकारच्या अखत्यारीतील पेट्रोलियम कंपन्यांच्या गॅस स्टेशन, पेट्रोल पंप येथे नियुक्त करण्यात येईल.
मंत्री श्री. लोढा यांनी अल्प उत्पन्न गटातील घटकांसाठी कमी कालावधीचे कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी देण्याबाबत सूचित केले होते, त्यानुसार नुकताच या प्रशिक्षणाचा प्रारंभ करण्यात आला.
मुंबई उपनगर कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रवीण खंडारे, रेवती रॉय फाउंडेशनचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
खेरवाडी सोशल वेल्फेअर असोसिएशन येथे शाश्वत विकास ध्येय प्रकल्प 2022-23 अंतर्गत या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मंत्री श्री. लोढा यांनी कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.
राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करून जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शाश्वत विकास ध्येय लघु प्रकल्पाअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील महिलांच्या कौशल्यविकास आणि रोजगारासाठी हा कार्यक्रम राबविला जातो.
वंचित घटकांसाठी विशेषतः अल्प उत्पन्न गटातील महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, महिलांचे प्रतिनिधित्व नसलेल्या क्षेत्रात त्यांना रोजगाराची संधी देणे, जेणेकरून त्यांचे सबलीकरण होईल, अल्प उत्पन्न कुटुबांचे उत्पन्न वाढवणे, जेणेकरून दारिद्र्य निर्मुलन होईल, ही या कार्यक्रमाची उद्दीष्ट्ये आहेत.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com