The lion brought from Gujarat will be released in the habitat of Sanjay Gandhi National Park
गुजरातमधून आणलेले सिंह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात सोडणार
मुंबई : गुजरातमधून आणलेली सिंहांची जोडी मंगळवारी 6 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सोडण्यात येणार आहेत.
ही सिंहांची जोडी काही दिवसांपूर्वी गुजरातेतील सक्करबाग प्राणी संग्रहालयातून मुंबईत दाखल झाली आहे. हे दोन्ही सिंह प्रत्येकी दोन वर्षे वयाचे आहेत. मुंबईतील वातावरणाशी परिचित होण्यासाठी काही काळ जाऊ देण्यात आला होता. आता मुंबईतील वातावरणाची पुरेशी सवय झाल्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात त्यांना सोडण्यात येणार आहे. हे सिंह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाल्याने येथील बंद पडलेली सिंह सफारी पुन्हा सुरू होणार आहे.
ही सिंहांची जोडी अवघ्या दोन वर्षांची असल्याने पुढील अनेक वर्षे सिंह सफारीचा आनंद पर्यटकांना घेता येईल तसेच या सिंहांच्या पुढच्या पिढ्याही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात निर्माण होतील, असा विश्वास वन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
भारतीय स्टेट बँकेने हे सिंह देखभालीसाठी दत्तक घेतले आहेत. वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी हे सिंह देखभालीसाठी दत्तक घेण्याची सूचना बँकेला केली होती. त्यांची सूचना बँकेने तातडीने स्वीकारल्याबद्दल वनमंत्र्यांनी बँकेचे आभार मानले आहेत.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com