World-class work in the Pali and Buddhist Studies Department of the University
विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागात जागतिक दर्जाचे काम
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: शब्दकोश निर्मिती, वारसा जतन, भाषांतराचे प्रकल्प
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून मागील तीन वर्षात अनेक नामांकित संस्थांबरोबर दीडशे सामंजस्य करार करण्यात आले. त्यातील पाच करार हे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागासोबत झाले आहेत.
याबाबत माहिती देताना पाली व बौद्ध अध्ययन विभागाचे प्रमुख डॉ. महेश देवकर म्हणाले, २०१५ पासून विभागाने खेन्त्से फाऊंडेशन इंडिया यांच्यासोबत करार केला आहे.
यामध्ये देशविदेशातील पाली व बौद्ध अध्ययन या विषयातील तज्ज्ञ किमान दोन महिने विभागात येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. याकरिता विभागाला दरवर्षी १९ लाख ७० हजार इतके अर्थसहाय्य मिळत आहे.
यातील काही प्राध्यापकांसोबत पाली आणि बौद्ध साहित्याच्या हस्तलिखितांचे संपादन आणि भाषांतर आम्ही करत आहोत. २०२० सालापासून विभागामध्ये बौद्ध पारिभाषिक शब्दकोशाचा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प सुरु आहे. यात माझ्यासह विभागातील प्रा. डॉ. लता देवकर आणि दोन विद्यार्थी काम करत आहेत. या अंतर्गत आतापर्यंत शब्दकोशाचे चार भाग प्रकाशित झाले आहेत. या शब्दकोशात आजपर्यंत पाली, संस्कृत, तिबेटन, इंग्रजी या भाषांचा समावेश होता परंतु या कोशाच्या पाचव्या भागापासून यामध्ये चिनी भाषेचा देखील समावेश करण्यात येणार आहे.
या प्रकल्पासाठी खेन्त्से फाऊंडेशनकडून आतापर्यंत ८८ हजार अमेरिकन डॉलर्स एवढे अनुदान प्राप्त झाले आहे. शब्दाकोशाचे असे एकूण ५० भाग प्रकाशित केले जाणार आहेत. पुढील पंधरा वर्षे हा प्रकल्प सुरू राहणार आहे.
खेन्त्से फाऊंडेशन इंडिया यांच्यासोबत ‘भाषा अध्ययन कार्यक्रम’ या अंतर्गत जो दुसरा करार झाला आहे त्या माध्यमातून विभागात चालू असलेल्या ९ विनाअनुदानीत भाषाविषयक अभ्यासक्रमांना शिक्षकवृत्ती व विद्यार्थी शिष्यवृत्ती या स्वरूपात रूपये दहा लाख एवढे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. या योजने अंतर्गत दोन एकत्रित पदवी अभ्यासक्रम तर काही पदविका अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.
डेक्कन अभिमत विद्यापीठासोबत जो करार झाला आहे त्या माध्यमातून या दोन्ही संस्थांनी एकत्रित येत बौद्ध वारसा आणि पर्यटन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे.
या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याच्या हेतूने संशोधन प्रकल्प व इंटर्नशीप प्रस्तावित आहेत. या दृष्टीने विभागाने, महाराष्ट्र राज्य, पुरातत्त्व व वस्तु संग्रहालय संचालनालय यांच्या सोबत सामंजस्य करार केला आहे. याद्वारे चालू शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना या संस्थेच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे असेही डॉ. देवकर यांनी सांगितले.
विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यासोबत जो सामंजस्य करार केला आहे त्या माध्यमातून पाली तिपिटक (बौद्ध साहित्य ग्रंथ) मराठी भाषांतराचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यामध्ये २५ हजार पानांचे भाषांतर विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी व तज्ज्ञ व्यक्ती अशा वीस जणांच्या गटामार्फत करण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षे हे काम सुरू राहणार आहे. यासाठी ४ कोटी ९५ लाख इतके अनुदान महाराष्ट्र सरकारकडून मंजूर झाले आहे.
तसेच तैवान येथील नामांकित अशा धर्मड्रम इन्स्टिट्यूट ऑफ लिबरल आर्ट्स या संस्थेसोबत करार करण्यात आला असून या माध्यमातून विद्यार्थी, प्राध्यापक, आणि संशोधन साहित्य यांचे आदान प्रदान करण्यात येत आहे. यातून विद्यापीठातील विद्यार्थ्यांना तैवान येथे जाऊन शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
विभागाबाबत बोलताना डॉ. देवकर म्हणाले, या विभागाची सुरुवात २००६ साली झाली. या साली गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणाला २ हजार ५५० वर्षे तर डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाणाला ५० वर्षे झाली होती. सध्या विभागात एकूण १८ अभ्यासक्रम चालविले जात असून त्यातील चार अभ्यासक्रम अनुदानित आहेत तर अन्य १४ अभ्यासक्रम विनाअनुदानीत तत्त्वावर चालवले जात आहेत.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com