In order to become self-reliant in the agricultural sector, knowledge of adjuncts with agriculture is necessary – Governor
कृषी क्षेत्रात स्वावलंबी बनण्यासाठी शेतीसोबत जोडव्यवसायाचे ज्ञान आवश्यक- राज्यपाल
महा ॲग्रीव्हिजन २०२२’ संमेलनाचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे : कृषीमध्ये आधुनिक ज्ञान आणि प्राचीन ज्ञानाचा संगम करून पुढे जाण्याची गरज आहे. नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासह दुग्धव्यवसाय आणि शेतीशी निगडित जोडव्यवसायांतील सर्वांगीण ज्ञान प्राप्त करुन काम केल्यास कृषी क्षेत्रात स्वावलंबी बनणे शक्य आहे, असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि ॲग्रीव्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालयात आयोजित ‘महा ॲग्रीव्हिजन २०२२’ च्या तिसऱ्या क्षेत्रीय संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी राज्यपाल कोश्यारी बोलत होते.
‘नैसर्गिक व सेंद्रिय शेती: जागतिक परिपेक्ष आणि कृषि उद्योजकता’ हा या दोन दिवसीय संमेलनाचा मुख्य विषय आहे.
कार्यक्रमास महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील, गुजरात नॅचरल अँड ऑरगॅनिक फार्मिंग अँड ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटी आनंदचे कुलगुरु डॉ. सी. के. टिंबाडिया, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, महा ॲग्रीव्हिजनचे आयोजन सचिव जयंत उत्तरवार, संयोजक मनीष फाटे, कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, संचालक विस्तार शिक्षण डॉ. तानाजी नरुटे आदी उपस्थित होते.
आज आपण कृषि उत्पादनात केवळ स्वयंपूर्ण नसून परदेशात कृषि उत्पादनांचे निर्यात करतो. आपली अन्नधान्याची गरज लक्षात घेता कृषि क्षेत्रात प्रयोग करून अन्नधान्याच्या बाबतीत आपला देश स्वयंपूर्ण झाला.
आज कृषि निविष्ठांच्या अतिवापरामुळे शेती नापिक होत आहे. आपल्याला आज शेतीमध्ये नवीन पद्धतीची गरज आहे. आपल्याला अतिप्राचीन नैसर्गिक शेतीकडे वळण्याची आवश्यकता आहे. देशी गाईचे शेण, गोमूत्राचे नैसर्गिक शेतीमध्ये महत्त्व वाढत आहे.
राज्यपाल म्हणाले, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्रातील सुभाष पाळेकर यांच्याकडून नैसर्गिक शेतीची माहिती घेतली त्याचे प्रयोग कुरूक्षेत्रमध्ये व त्यानंतर हिमाचल प्रदेशात केले. त्याचा चांगला लाभ शेतकऱ्यांना झाला. त्याची माहिती घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातला नैसर्गिक शेतीचे मॉडेल करण्याचे निश्चित केले आणि त्यानुसार देशातील पहिले नैसर्गिक शेती विद्यापीठ तेथे स्थापन केले.
जीआय टॅगींगसारख्या बाबींचा शेतकऱ्यांच्या उत्पादनाला अधिक भाव मिळून फायदा होईल. त्यामुळे कृषिमध्ये आधुनिक आणि प्राचीन ज्ञानाचा संगम करून पुढे गेले पाहिजे. कोरोना कालावधीमध्ये सर्व क्षेत्र थांबले तेव्हा कृषि क्षेत्र सुरूच राहिले. आपण कृषीचे विद्यार्थी असल्याबद्दल अभिमान बाळगा असे सांगून शेतीच्या सेवेतून धरतीमातेचे ऋण अदा करा, असा सल्ला श्री. कोश्यारी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कुलगुरू डॉ. टिंबाडिया म्हणाले, गुजरात मध्ये स्थापित देशातील पहिल्या नैसर्गिक शेतीच्या कृषि विद्यापीठामार्फत शेतकऱ्यांच्या शेतावर संशोधनाचे काम सुरू असून १ लाख ७० हजार लोकांनी आपल्या शेतात प्राकृतिक शेतीचे चांगले प्रकल्प घेतले.
नवीन पिढीच्या आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीकडे वळण्याची गरज आहे. छोट्या शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती उपयुक्त व्हावी यासाठी संशोधन सुरू आहे. उत्कृष्ट अन्न उत्पादन आणि मूल्यवर्धनाला मोठी संधी आहे. एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात नैसर्गिक शेतीचा समावेश करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही ते म्हणाले.
कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील म्हणाले, कृषि उत्पादकता वाढविण्याच्या प्रयत्नातून किटकनाशके, खतांच्या अतिवापरामुळे कर्करोगाबरोबर अनेक आजार वाढत आहेत. शेतीतील कर्ब कमी होत आहे. त्यामुळे नैसर्गिक शेतीचे महत्व वाढते आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयानुसार सर्वांना पुरेसे अन्न द्यायचे आहे, मात्र ते सुरक्षित आणि सकस असेल याची काळजी घ्यायची आहे. केंद्र शासनाने नुकतेच १ हजार ५०० कोटी रूपये नैसर्गिक शेती आणि सेंद्रीय शेतीसाठी जाहीर केले आहे. त्यामुळे या क्षेत्राची निश्चितपणे वाढ होईल. महात्मा फुले कृषी विद्यापीठा नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम घेत आहे, असेही ते म्हणाले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com