1000 centers of ‘Khelo India’ will be set up by August 15 next year
पुढच्या वर्षीच्या १५ ऑगस्टपर्यंत ‘खेलो इंडिया’ ची १ हजार केंद्रं उभारली जाणार
नवी दिल्ली : देशभरात पुढच्या वर्षीच्या १५ ऑगस्ट पर्यंत ‘खेलो इंडिया’ ची एक हजार केंद्रं उभारली जातील, असं युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं.
क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आणि त्या संदर्भात सरकारद्वारे केल्या जात असलेल्या उपाययोजना याविषयी लोकसभेतल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. सरकारनं खेळांप्रती नागरिकांचा दृष्टिकोन बदलण्याचं काम केलं असून आत्तापर्यंत ७३३ केंद्रांना याआधीच सरकारनं मंजुरी दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
खेळाच्या पायाभूत सोयी-सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर विशेष लक्ष दिलं जात असून पॅरा-ऍथलिट्सच्या बाबतीतही कोणताही दुजाभाव केलेला नाही. टोकियो पॅराऑलिम्पिक आणि डेफ ऑलिम्पिक मध्येही भारतानं या आधीच्या तुलनेत अधिक चांगली कामगिरी केली आहे, असं ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, भारत देश इतर देशांच्या तुलनेत क्रीडा प्रकारात मागे पडत असल्याचं अधोरेखित करत क्रीडा क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात अधिक तरतूद करण्याची
आवश्यकता आहे असं, काँग्रेसचे अधीर रंजन यांनी या चर्चेत भाग घेत सांगितलं.
भारत केवळ क्रिकेट या क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी बजावत असून प्रशिक्षकांची कमतरता आणि आर्थिक तरतुदीच्या अभावी देश हॉकी आणि फुटबॉल मध्ये फिका पडत आहे, असं बहुजन समाज पक्षाचे रितेश पांडे यांनी यावेळी म्हटलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com