Training for Scheduled Caste candidates for start-ups
अनुसूचित जातीच्या उमेदवारांना स्टार्ट-अपसाठी प्रशिक्षण
पुणे : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) या संस्थांमध्ये अनुसूचित जातीच्या उमेदवारांना उद्योजक बनण्यासाठी व स्टार्ट- अपसाठी ६ महिन्याचे प्रशिक्षण आनुषांगिक उपक्रमांद्वारे देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.
अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलेल्या अनुसूचित जातीतील पात्र उमेदवारांची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी शशिकांत कुंभार यांनी दिली आहे.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ही संस्था सन १९८८ पासून उद्योजकता विकासासाठी प्रशिक्षणाच्या माध्यमातून कार्य करणारी महाराष्ट्र शासनाची एक अग्रणी स्वायत्त प्रशिक्षण संस्था आहे.
या संस्थेमार्फत आतापर्यंत महाराष्ट्रातील १८ ते ४५ वयोगटातील लाखो युवक व युवतींना १०० हून अधिक स्वयंरोजगारांचे प्रशिक्षण प्रदान करण्यात आले आहे. त्यातील बहुतांश प्रशिक्षणार्थीना बँकांकडून कर्ज मिळविण्यासाठी मार्गदर्शन पुरविण्यात आले असून त्यामुळे नवउद्योजकांना स्वतःचे उद्योग सुरु करण्यात यश प्राप्त झाले आहे.
या प्रशिक्षणात भाग घेवू इच्छिणाऱ्या अनु. जातीतील उमेदवारांनी https://mced.co.in/Training_Details/?id=2785 या संकेतस्थळावर नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी वरिष्ठ प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र पुणे (भ्रमणध्वनी क्रमांक ९४०३०७८७५२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com