The Namami Gange initiative was hailed by the United Nations
नमामी गंगे उपक्रमाचा संयुक्त राष्ट्रांनी केला गौरव
जगाला नैसर्गिक पद्धतीने पुनरुज्जीवित करणाऱ्या अव्वल दहा पुनरुज्जीवन उपक्रमांपैकी एक म्हणून नमामी गंगे उपक्रमाचा संयुक्त राष्ट्रांनी केला गौरव
नवी दिल्ली : जगाला नैसर्गिक पद्धतीने पुनरुज्जीवित करणाऱ्या अव्वल दहा पुनरुज्जीवन उपक्रमांपैकी एक म्हणून भारतातील पवित्र नदी गंगेचा पुनरुज्जीवन उपक्रम नमामी गंगेचा, संयुक्त राष्ट्रांनी (यूएन) गौरव केला आहे.
जागतिक संवर्धन दिनानिमित्त कॅनडातील मॉन्ट्रियल येथे 14 डिसेंबर 2022 रोजी जैवविविधतेवर आधारित (सीबीडी) पक्षांच्या 15व्या परिषदेच्या (कॉप15) एका कार्यक्रमात, नमामि गंगेचे महासंचालक जी. अशोक कुमार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
जगभरातल्या 70 देशांतील 150 उपक्रमांमधून नमामी गंगा उपक्रमाची निवड झाली. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (यूएनईपी) आणि संयुक्त राष्ट्र अन्न आणि कृषी संघटनेद्वारे (एफएओ) समन्वयित जागतिक चळवळ, युनायटेड नेशन्स डेकेड ऑन इकोसिस्टम रिस्टोरेशन अंतर्गत याची निवड झाली आहे.
पृथ्वीवरील निसर्गाचा, इथल्या स्थळांचा ऱ्हास रोखण्यासाठी आणि त्याच्या पुनरुज्जीवनाच्या दृष्टीने याची रचना केली आहे. नमामि गंगेसह इतर मान्यताप्राप्त उपक्रम, आता संयुक्त राष्टांचे पाठबळ, निधी तसेच तांत्रिक कौशल्य प्राप्त करण्यास पात्र असतील.
“जगातील अव्वल दहा परिसंस्था पुनरुज्जीवन उपक्रमांपैकी एक म्हणून नमामि गंगेला मिळालेली मान्यता, भारत सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशनने केलेल्या एकत्रित प्रयत्नांची साक्ष आहे. मला आशा आहे की आमचे प्रयत्न जगभरातील अशाच इतर समान उपक्रमांसाठी पथदर्शक ठरतील” असे नमामी गंगेचे महासंचालक जी. अशोक कुमार म्हणाले.
“नमामि गंगे हा भारतातील लाखो लोकांसाठी जीवनवाहिनी असलेल्या गंगा नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न आहे. निसर्गाचे शोषण करणारे आपले नाते बदलण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे अशा या काळात, या पुनरुज्जीवनाचे सकारात्मक परिणाम कमी लेखता येणार नाहीत” असे यूएनईपीचे कार्यकारी संचालक इंगर अँडरसन म्हणाले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com