Emphasis on increasing investment in the non-conventional energy sector through industry-friendly policy
उद्योगस्नेही धोरणाद्वारे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातही गुंतवणूक वाढविण्यावर भर
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेडा) च्या ऑनलाईन सिंगल विंडो पोर्टलचे उद्घाटन
मुंबई : अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचे क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत आहे. या क्षेत्रात विकास करण्यासाठी मोठी संधी असून या क्षेत्रात ठरविलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी उद्योगस्नेही धोरणावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सह्याद्री अतिथीगृह येथे ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (MEDA)च्या सिंगल विंडो पोर्टलचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातही मोठी गुंतवणूकही होत आहे. गुंतवणूकदार व विकासकांना उद्योग उभारण्यासाठी ‘इज ऑफ डुईंग’ अत्यंत महत्त्वपूर्ण असते. त्यादृष्टीने ‘महाऊर्जा’ने विकसित केलेले सिंगल विंडो पोर्टल गुंतवणूकदार व विकासकांसाठी खूप उपयोगी ठरणार असल्याचे श्री.फडणवीस यांनी सांगितले.
ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला म्हणाल्या, प्रत्येक क्षेत्रात ऊर्जेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता अपारंपरिक ऊर्जा निर्मिती आणि वापराला अधिक चालना देणे गरजेचे झाले आहे. त्यादृष्टीने या क्षेत्रात गुंतवणूकदार व विकासकांना साह्यभूत ठरेल असे सिंगल विंडो पोर्टल तयार करण्यात आले असल्याचे शुक्ला यांनी सांगितले.
महाऊर्जाचे महासंचालक रविंद्र जगताप म्हणाले, एक खिड़की ऑनलाईन वेब पोर्टल कार्यान्वित करण्यासाठी महावितरण, महापारेषण, राज्यभार प्रेषण केंद्र व मुख्य विद्युत निरीक्षक कार्यालय यांच्याशी समन्वय साधून, त्याअनुषंगाने विविध टप्प्यांवर परवानगीसाठी लागणारा वेळ हा कमीत कमी करण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्प विकासक, प्रकल्प गुंतवणूकदार यांना मंजुरीसाठी लागणाऱ्या वेळेत बचत होणार असून राज्यात अपारंपरिक ऊर्जा धोरणांतर्गत नवीन गुंतवणूक होण्यास मदत होणार आहे.
महाऊर्जाचे महाव्यवस्थापक श्री.आनंद रायदुर्ग यांनी एक खिडकी वेब पोर्टल विकसित करणेसाठी कार्यरत असणाऱ्या संबंधित संस्थांचे अधिकारी, कर्मचारी यांचे आभार मानले.
अक्षय ऊर्जा प्रकल्प : सिंगल विंडो पोर्टल
अक्षय ऊर्जा प्रकल्पाच्या कामासाठी सध्याच्या परिस्थितीत विकसक/गुंतवणूकदार/बिड विजेत्याला विविध विभागांकडून परवानग्या, मंजूरी, संमती इ. मिळवणे आवश्यक आहे. ही मंजुरी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि वेळ कमी करण्यासाठी सिंगल विंडो वेब पोर्टलचा विकास, व्यवसाय करण्याच्या सुलभतेसाठी करण्यात येत आहे.
आता या सिंगल विंडो पोर्टलच्या मदतीने भागधारक ऑनलाइन अर्ज करू शकतील आणि विविध विभागांच्या मंजुरी/परवानग्यांची संपूर्ण प्रक्रिया उदा. (MEDA, MSEDCL, MSETCL, चीफ इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर, SLDC इ.) सर्व पेमेंट्ससह केवळ ऑनलाइन प्रणालीद्वारे केले जातील.
संपूर्ण प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी, MEDA ने, सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून, शक्य तितक्या प्रत्येक पायरी/टप्प्यावरील मंजुरीसाठी वेळ कमी केली आहे.
या सिंगल विंडो पोर्टलच्या अंमलबजावणी प्रक्रियेतील कोणतीही शंका संबंधित विभागांद्वारे नियुक्त केलेल्या तक्रार अधिकारी MEDA आणि नोडल अधिकाऱ्याद्वारे वेळेत सोडविली जाईल.
हे सिंगल विंडो पोर्टल संपूर्ण प्रक्रिया सुव्यवस्थित करेल, भागधारकांना त्यांच्या मंजुरी प्रक्रियेतील वेळ कमी करेल आणि महाराष्ट्र राज्यातील अक्षय ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देईल.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com