Reduction in terrorist activities due to central government policies
केंद्र सरकारच्या धोरणांमुळं दहशतवादी कारवायांमध्ये कपात
-अनुराग ठाकूर
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अतिरेक्यांच्या विरोधातल्या धोरणांमुळं दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी उचललेल्या पावलांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते.
२०१४ सालापासून भारतानं केलेले सर्जिकल स्ट्राईक, बालाकोटमधली कारवाई आणि एकापाठोपाठ एक दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या कारवायांमुळे जम्मू आणि काश्मिरमधे दहशतवादी कारवाया १६८ टक्के कमी झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
पाकिस्ताननं जर दहशतवादी कारवायांना अर्थपुरवठा आणि मदत करणं थांबवलं नाही तर त्यांना त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील असंही त्यांनी सांगितलं.
सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या दहशतवादी संस्थांवर बंदी घालण्यात केंद्र सरकार मागे पुढे पाहणार नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
श्री ठाकूर म्हणाले, मोदी सरकारने समाजहिताच्या बहाण्याने कट्टरतावादाला प्रोत्साहन देणाऱ्या संघटनेवर (पीएफआय) बंदी घालण्यास मागेपुढे पाहिले नाही. कट्टरपंथी संघटनांवर कारवाई सुरूच राहील, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
इशान्येकडच्या राज्यांमध्येही २०१४ पासून शांतता नांदायला सुरु झाली असून हिंसाचाराच्या घटनांमध्ये ८ टक्के घट झाली आहे. सामान्य नागरिकांच्या हत्यांच्या घटनांमध्येही ८९ टक्के घट झाली आहे, असंही ते म्हणाले. या काळात ६ हजार दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असून माओवाद्यांच्या संख्येत २६५ टक्के घट झाली आहे. असंही त्यांनी सांगितलं.
केंद्र सरकारनं प्रत्येक नागरिकांच्या जिविताला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. युक्रेन-रशिया युद्धाच्या काळात साडे २२ हजार भारतीय नागरिकांना सुरक्षितरित्या मायदेशी आणण्यात आलं आहे.
अफगाणिस्तानातून ६७० भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली. वुहानमधूनही ६४७ भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे असंही त्यांनी सांगितलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com