The role of education will be important in the development of a new India
नव्या भारताच्या विकासात शिक्षणाची भूमिका महत्त्वाची ठरणार
-प्रधानमंत्री
नवी दिल्ली : नव्या भारताच्या विकासात शिक्षणाची भूमिका महत्त्वाची ठरणार असून, नव्या शिक्षण धोरणाच्या माध्यमातून देश पहिल्यांदाच भविष्यकाळासाठी लाभदायक उच्च शिक्षण व्यवस्था तयार करत आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. श्री स्वामी नारायण गुरुकुल राजकोट संस्थानच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते.
सरकार शिक्षण क्षेत्रात झपाट्याने बदल करत आहे असं सांगत शिक्षणाच्या पायाभूत सुविधा असोत की शैक्षणिक धोरण, स्वातंत्र्याच्या या अमृत काळामध्ये देश प्रत्येक स्तरावर काम करत आहे, हे त्यांनी नमूद केलं.
“खरे ज्ञान लोकांना देणं ही अत्यंत महत्वाचे काम आहे. भारताचे ज्ञान आणि शिक्षणक्षेत्रातील समर्पित कार्य, यातूनच भारतीय संस्कृतीची पाळेमुळे रूजली गेली आहेत” असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
गुरूकुल विद्या प्रतिष्ठानमने राजकोट येथे केवळ सात विद्यार्थ्यांनी सुरूवात केली असली तरीही आज जगभरात त्याच्या चाळीस शाखा आहेत आणि सर्व जगातून हजारो विद्यार्थी आकर्षित होऊन तेथे प्रवेश घेण्यासाठी येत आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.
त्यांनी पुढे सांगितले की, गेल्या 75 वर्षांत गुरूकुल संस्थेने उत्तम विचार आणि मूल्यांनी विद्यार्थ्यांची मने आणि ह्रदयांची मशागत केली आहे. त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकेल.
अध्यात्मिकतेपासून ते इस्त्रो आणि बीएआरसीमधील वैज्ञानिक या क्षेत्रातील समर्पित विद्यार्थ्यांसह गुरूकुल परंपरेने देशाच्या प्रत्येक क्षेत्राचे पालनपोषण केले आहे, असे ते म्हणाले. गरीब विद्यार्थ्यांना केवळ एक रूपया शुल्क आकारले जात असून त्याद्वारे त्यांच्यासाठी शिक्षण घेणे सहजसाध्य होत असल्याच्या बाबीवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.
आज देशात मोठमोठ्या शिक्षण संस्थांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. वर्ष २०१४ नंतर वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्येत ६५ टक्क्यांहुन अधिक वाढ झाली आहे, याकडे प्रधानमंत्र्यांनी लक्ष वेधलं. अधःकाराच्या युगांमध्ये भारताने दिलेल्या प्रकाशामुळे आधुनिक जगाचा आणि आधुनिक विज्ञानाचा प्रवास सुरु झाला. शून्यापासून अनंतापर्यंत, आपण प्रत्येक क्षेत्रात संशोधन केलं आणि, नवीन निष्कर्ष काढले असं त्यांनी सांगितलं.
ज्या काळात जगातील इतर देश त्यांची राज्ये आणि राजघराण्यांनी ओळखले जात होते, त्या काळात भारतभूमीला गुरुकुलांसाठी ओळखले जात असे,ज्या कालखंडात जगात लिंग समानता या शब्दाचाही जन्म झाला नव्हता त्यावेळी गार्गी मैत्रेयी यांसारख्या विदुषी भारतात शास्त्रांचा अभ्यास करत होत्या, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com