An opportunity for students to study the changing environment..!!
बदलत्या पर्यावरणाचा अभ्यास करण्याची विद्यार्थ्यांना संधी..!!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सामंजस्य करार
पुणे : पर्यावरण संवर्धनासोबतच बदलत्या पर्यावरणीय बदलांचा अभ्यास करण्याची संधी आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळाली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सिंगापूर येथील ब्ल्यू प्लॅनेट स्किल प्रायव्हेट लिमिटेड’ सोबत सामंजस्य करार केला असून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शाश्वत विकासाचे धडे देण्यात येणार आहेत.
‘ब्ल्यू प्लॅनेट स्किल प्रायव्हेट लिमिटेड’ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मानसशास्त्र विभाग यांच्यात हा सामंजस्य करार मंगळवार दिनांक २७ डिसेंबर रोजी विद्यापीठातील कुलगुरू कार्यालयात झाला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, मानसशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र म्हस्के, डॉ.जुही देशमुख, ब्लू प्लॅनेटचे मुख्य कार्यकारी संचालक हर्ष मेहरोत्रा, कौशल्य विभागाचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गौर आदी मान्यवर उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना डॉ.म्हस्के म्हणाले, या कराराच्या माध्यमातून विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शाश्वत विकास, पुनर्वापर, हरित वाहतूक, हरित ऊर्जा, आरोग्य, जल संवर्धन, आरोग्य आणि सुरक्षा, आहारशास्त्र आदी विषयातील शिक्षण घेता येणार आहे. हे अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रेयांक देखील मिळणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये पर्यावरणीय बदलांचा अभ्यास करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच यंदाच्या वर्षी होणाऱ्या ‘जी २०’ परिषदेची संकल्पना देखील शाश्वत विकास आहे. त्या दिशेनेच विद्यापीठाने या कराराच्या माध्यमातून पर्यावरण आणि शाश्वत विकासाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com