The High Court rejected the plea for the release of Prasad Purohit accused in the Malegaon blast case
मालेगाव बाँबस्फोट प्रकरणी आरोपी प्रसाद पुरोहित सुटकेसाठीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
मुंबई : मालेगाव बाँबस्फोट प्रकरणी आपल्याला आरोपांमधून मुक्त करावं यासाठी आरोपी प्रसाद पुरोहित यानं दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं आज फेटाळली.
आपल्याविरुद्ध खटला दाखल करण्यासाठी फोजदारी प्रक्रिया संहितेच्या १९७ व्या कलमानुसार योग्य ती अनुमती घेतली गेली नव्हती, म्हणून आपल्याला आरोपातून मुक्त करावं, असं पुरोहितच्या याचिकेत म्हटलं आहे.
आपण लष्करी अधिकारी म्हणून गुप्त माहिती गोळा करण्याचं कर्तव्य करत होतो, असा दावा त्यानं केला आहे. मात्र बाँबस्फोट आणि लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणं हे कार्यालयीन कर्तव्य नाही, त्यामुळे याबाबतीत कलम १९७ चा मुद्दा गैरलागू आहे, असं सांगत न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि न्यायमूर्ती पी डी नाईक यांच्या खंडपीठानं ही याचिका फेटाळली. याआधी राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयानंही ही याचिका फेटाळली होती.
हत्या, प्राणघातक शस्त्रांनी गंभीर इजा करणं, धर्म, वंश, भाषा, जन्मस्थळ या मुद्यांवरून वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रूत्व निर्माण करणं, इत्यादी आरोप पुरोहितवर आहेत. त्याबरोबरच पूर्वग्रहदूषित भूमिकेतून सामाजिक सलोखा बिघडवणारी कृत्य करणं, शस्त्रास्त्र कायदा, स्फोटक पदार्थ कायदा आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यातल्या विविध कलमांतर्गत वेगवेगळे आरोप त्याच्यावर आहेत.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com