Salutations to Savitribai at Phule Pune University
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाईंना अभिवादन
डॉ.गणेश राऊत यांच्या व्याख्यानाचे आयोजन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे व प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.
यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, सर्व अधिकारी तसेच सेवक यावेळी उपस्थित होते. यावेळी एच.व्ही.देसाई महाविद्यालयाचे इतिहास विभागाचे प्रमुख डॉ.गणेश राऊत यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर डॉ.प्रफुल्ल पवार यांच्यासह महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख डॉ.विश्वनाथ शिंदे उपस्थित होते.
आपल्या व्याख्यानात बोलताना डॉ. राऊत म्हणाले, सावित्रीबाई फुले यांचे कार्य हे त्यांच्या जन्माच्या जवळपास दोनशे वर्षांपर्यंत सत्य शोधक समाजाच्या कार्यातून सुरू आहे आणि पुढेही सुरू राहील. भविष्यातही भावी पिढीने सावित्रीबाईंचे कार्य पुढे न्यावे हीच त्यांच्या कार्याला आदरांजली आहे .
यावेळी राऊत यांनी सत्यशोधक समाजातील विचारवंतांनी सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा कशा प्रकारे पुढे नेला याचे दाखले दिले. तसेच चळवळींच्या माध्यमातून त्यांचे कार्य सुरू ठेवण्याचा आजवर कसा प्रयत्न झाला आहे याचाही उलगडा त्यांनी आपल्या व्याख्यानात केला.
डॉ.विश्वनाथ शिंदे म्हणाले, पुराव्यांच्या माध्यमातून जो इतिहासकार इतिहास मांडतो, तोच खरा इतिहासकार असतो. महात्मा फुले या वटवृक्षाच्या छायेत सावित्रीबाई वाढल्या तरी त्यांचे वेगळेपण सांगणारी पुस्तके, संदर्भ ग्रंथ अजूनही येताना दिसतायेत ही खरोखर स्वागतार्ह बाब आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com