The administration is ready to maintain the smooth power supply in the wake of Mahavitaran employees’ strike
महावितरणच्या कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज
मुंबई : कथित संभाव्य खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी आणि अभियंता संघर्ष समितीनं, मध्यरात्रीपासून बहात्तर तासांचा संप पुकारला आहे.
अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत, महावितरण कर्मचाऱ्यांच्या सुमारे ३० संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत. गरज पडल्यास हा राज्यव्यापी संप तीन दिवसांनंतरही सुरू ठेवू, अशी भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
दरम्यान, या संपाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या सगळ्या ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत राहील याची खबरदारी घेतली जात आहे. वीजपुरवठ्यासंदर्भात काही तक्रारी असल्यास मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राच्या, एक नऊ एक दोन, या नि:शुल्क क्रमांकावर संपर्क साधावा, असं महावितरणनं म्हटलं आहे. मुंबईच्या मुख्य कार्यालयासह सर्व परिमंडळ कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले आहेत.
वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांनी टोल फ्री क्रमांक 1800-212-3435/ 1800-233-3435/1912/19120 यावर संपर्क साधावा. असं आवाहन करण्यात आलं आहे.
या संपाच्या पार्श्वभूमीवर कल्याण परिमंडलातल्या ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक तयारी ठेवण्यात आली असून वसई, विरार, नालासोपारा, आचोळे, वाडा भागाचा समावेश असलेल्या वसई मंडल कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला आहे. पालघर, बोईसर, डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा आणि विक्रमगडसाठी पालघर मंडल कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
दरम्यान, या संपामुळे वाशिम शहरासह वाशिम जिल्ह्यातील 43 गावांचा वीज पुरवठा काल रात्री पासून खंडित झाला आहे.
धुळे जिल्ह्यात वीज कर्मचारी संपावर उतरले असून आत्तापर्यंत जिल्ह्यातील जवळपास 15 वीज उपकेंद्रांमधील वीजपुरवठा खंडित झाला आहे. कर्मचार्यांनी धुळे शहरातील साक्री रोड येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ धरणं आंदोलन सुरू केलं आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com