An opportunity for the people of Pune to get involved in Chakrabhajan through the Ausekar family
औसेकर कुटुंबियांच्या माध्यमातून चक्रीभजनात लीन होण्याची पुणेकरांना संधी
विद्यापीठात औसेकर महाराजांचे शुक्रवारी चक्रीभजन
पुणे : औसेकर कुटुंबियातील पाच पिढ्या तब्बल २२५ वर्षांपासून श्री विठ्ठलभक्तीचा दिव्य आध्यात्मिक अनुभव देणारी चक्रीभजन ही परंपरा जोपासत आहेत. औसेकर कुटुंबियांच्या माध्यमातून चक्रीभजनात लीन होण्याची संधी पुणेकरांना येत्या शुक्रवारी मिळणार आहे.
गुरुबाबा महाराज औसेकर म्हणजे डोक्यावर हिरवा फेटा, गळ्यात प्रासादिक नारदीय विणा, तुळशीहार आणि पायी चाळ बांधून दीमडी, झांज, मृदुंग या वाद्यांच्या साथीने चक्रीभजनाच्या माध्यमातून विठ्ठलाचा जयजयकार करीत १४ अभंग, भजने सादर करणार आहेत.
केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे पुणे विभागीय कार्यालय (आयसीसीआर) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातर्फे शुक्रवार, दि. ६ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता विद्यापीठातील संत नामदेव सभागृह येथे चक्रीभजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या पुणे विभागीय कार्यालयाअंतर्गत असलेल्या सल्लागार समितीचे सदस्य ज्येष्ठ गायक पंडित सुहास व्यास, आयसीसीआरच्या विभागीय निदेशक निशी बाला, ललित कला केंद्राचे प्रमुख डॉ. प्रवीण भोळे आणि चक्रीभजन परंपरेतील साधक ज्ञानराज गुरू बाबा औसेकर यांनी याबाबतची माहिती दिली.
या कार्यक्रमाला मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूकर यांची प्रमुख उपस्थिती असणार असून कार्यक्रमाचे निरुपण उल्हास पवार करणार आहेत.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com