A plan should be prepared for the preservation and conservation of Sri Jotiba temple premises and Panhala fort
श्री जोतिबा मंदिर परिसर व पन्हाळा किल्ल्याच्या जतन, संवर्धनासाठी आराखडा तयार करावा
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : नव्या पिढीला आपला समृद्ध इतिहास माहिती होणे गरजेचे असून त्यादृष्टीने श्री जोतिबा मंदिर व परिसर तसेच पन्हाळा किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे श्री जोतिबा मंदिर व परिसरातील विकासाबाबत तसेच किल्ले पन्हाळ्याच्या संवर्धनासंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत बैठक झाली. यावेळी आमदार विनय कोरे, प्रधान सचिव डॉ. राजगोपाल देवरा, प्रधान सचिव विकास खारगे, पुरातत्व विभागाचे मुंबई परिमंडळ अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ.राजेन्द्र यादव, संचालक डॉ.तेजस गर्गे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, आपला इतिहास अतिशय समृद्ध असून प्राचीन वारसास्थळांचे जतन व संवर्धन वेळीच होणे गरजेचे असते. त्यादृष्टीने श्री जोतिबा मंदिर व परिसर तसेच पन्हाळा किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी एकात्मिक विकास आराखडा तयार करावा. यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम आखून ही कामे तत्काळ पूर्ण करण्यात यावीत.
यापूर्वी परिसराचे तत्काळ सर्वेक्षण करून त्यांच्या परीपूर्ण नोंदी ठेवण्यात याव्यात. या कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही श्री.फडणवीस यांनी सांगितले.
प्राचीन स्थळांच्या जतन व संवर्धनाची कामे जलदगतीने पूर्ण करण्यावर भर द्यावा, जेणेकरून नव्या पिढीपर्यंत आपला समृद्ध इतिहास अधिक नेमकेपणाने पोहोचवता येईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.
श्री जोतिबा मंदिर व परिसर तसेच पन्हाळा किल्ला आराखडा यामध्ये समाविष्ट करावयाच्या बाबींसंदर्भात आमदार विनय कोरे यांनी सूचना मांडल्या.
श्री जोतिबा मंदिर व परिसर तसेच पन्हाळा किल्ला ही ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व असलेली महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत. श्री जोतिबा मंदिर परिसर वन्यजीव विविधतेमध्येही वैशिष्ट्यपूर्ण आहे.
येथे वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. येथील हरित पट्टयांचे जतन व संवर्धन केल्यास वन्यजीव अधिवासातच जपता येतील. भूमीगत विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा, स्वच्छतागृहे तसेच दर्शन मंडपाची कामे हाती घेण्यात आली असून ही कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com