मातृमंदिरच्या नूतन इमारतीत अनुभवावर आधारित शिक्षणाला अनुरूप वातावरण

Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Environment suitable for experience-based learning in the new building of Matri Mandir

मातृमंदिरच्या नूतन इमारतीत अनुभवावर आधारित शिक्षणाला अनुरूप वातावरण

-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : नव्या शैक्षणिक धोरणात पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक स्तरावर अभ्यासाचा विचार न करता ज्या-ज्या गोष्टीचा विकास होऊ शकतो त्याचा सर्वाधिक विकास करण्याचा विचार किंवा व्यक्तिमत्व फुलविण्याचा विचार केला असून मातृमंदिरच्या नूतन इमारतीत अशाप्रकारे अनुभवावर आधारित शिक्षणाला अनुरूप वातावरण तयार केले आहे. उद्याची पिढी घडविण्यासाठी अशा शिक्षणाचा फायदा होईल आणि त्यातून देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीला हातभार लागेल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
File Photo

न्यू इंग्लिश स्कूल परिसरातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे मुरलीधर लोहिया मातृमंदिर नूतन वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे क्रीडामंत्री गिरीष महाजन, संस्थेचे विश्वस्त जगदीश कदम, श्री मुकुंद भवन ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त पुरुषोत्तमदास लोहिया, डॉ.रवींद्र आचार्य, आशिष पुराणिक, कार्यवाह धनंजय कुलकर्णी , मुख्याध्यापिका माधुरी बर्वे आदी उपस्थित होते.

मोठा इतिहास लाभलेल्या ऐतिहासिक संस्थेत येण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करून श्री.फडणवीस म्हणाले, लोकमान्य टिळक, आगरकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यासारख्या द्रष्ट्या महापुरुषांनी या संस्थेची स्थापना केली. आज ही संस्था एका वटवृक्षाप्रमाणे विविध शाखांमध्ये बहरली असून ५० हजार विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा देण्याचे कार्य करते आहे.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या परंपरेला साजेसे मातृमंदिर सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रीय शिक्षणाची आवश्यकता असलेल्या काळात स्थापन झालेल्या या संस्थेने देशात नवे शिक्षणाचे प्रयोग होत असताना आणि नवे धोरण अंमलात येते तेव्हा अग्रेसर राहून त्याचा अवलंब आपल्याकडे करावे हेच अपेक्षित होते आणि ते मातृमंदिरने केले असल्याचे सांगून श्री.फडणवीस यांनी शाळेचे अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांना शाळा हवीशी वाटेल असे वायुमंडल अपेक्षित

कुठल्याही संस्थेचे मूल्यमापन हे सुंदर इमारतीच्या आधारे किंवा पायाभूत सुविधांच्या आधारे करता येत नाही, तर त्या शाळेची इमारत आपले बाहु उघडून प्रत्येक व्यक्तीला आपल्या कवेत घ्यायला तयार आहे का यावर होते. विद्यार्थ्यांना तिथे जाण्याची इच्छा होईल असे वातावरण शिक्षक करतात का, तिथे गेल्यानंतर विद्यार्थ्यांना भिती न वाटता तिथले वातावरण हवेहवेसे वाटेल असे वायुमंडल तिथे तयार होते काय या आधारावर शाळेचे मूल्यमापन होते. जुन्या काळात शिक्षणाची पद्धत कठोर होती.आज शिक्षणाची ओढ तयार व्हावी, विद्यार्थ्यांना आवड निर्माण होईल असे शिक्षण अपेक्षित आहे. प्रत्येक व्यक्तीतील गुणांची अभिव्यक्ती करता येईल असा विचार नव्या शैक्षणिक धोरणाने केला आहे.

मातृभाषेला ज्ञानभाषा करायची आहे

इंग्रजी जगात बोलली जाणारी मोठी भाषा असल्याने तिचा तिरस्कार करून चालणार नाही, मात्र मातृभाषेचा पुरस्कार करावा लागेल. जगात प्रगत राष्ट्रांच्या विकासात मातृभाषेचा वाटा आहे, त्यामुळे मातृभाषेचा विचार इंग्रजी शिक्षण घेताना करावाच लागेल. त्यामुळे नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतल्या शिक्षणाचा समावेश सर्व विषयात करण्यात आला आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण मातृभाषेत घेता येणार आहे. आपली भाषा ज्ञानभाषा केल्याने आणि त्या भाषेत ज्ञान दिल्याने प्रत्येक व्यक्तीला आपल्या गुणानुरूप विकसीत होण्याची संधी मिळेल. ग्रामीण युवकांनाही स्वतःची प्रगती साधता येईल.

शिक्षणाच्या माध्यमातून आपण नवभारत घडवत आहोत. विद्यार्थ्यांना विजयाचा इतिहास शिकवायला हवा. आपली उज्ज्वल संस्कृती आणि परंपरेचा स्विकार करत आणि त्याचवेळी संविधानाने दिलेल्या मुल्यांची जोपासना करत आपल्याला पुढे जायचे आहे. संविधानाची मूल्ये रुजवली आणि आपल्या संस्कृतीतील चांगल्या बाबी शिक्षणात आणल्यास भारत विश्वगुरू पदापर्यंत पेाहोचेल. असा पाया भरण्याचे कार्य मातृमंदिर संस्थेने केले असल्याचे श्री.फडणवीस म्हणाले.

यावेळी श्री.लोहिया यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. संस्थेची वाटचाल नव्या युगाला साजेशी असल्याचे ते म्हणाले.

संस्थेचे विश्वस्त कदम यांनी प्रास्ताविकात संस्थेची माहिती दिली. शाळेच्यावतीने राष्ट्रीय शिक्षण आणि अनुभवावर आधारित शिक्षण पद्धतीवर भर दिला जातो असे त्यांनी सांगितले. नव्या शैक्षणिक धोरणाला अनुकूल नूतन इमारत असल्याचे ते म्हणाले.

नूतन इमारत उभी करण्यात योगदान देणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *