Maharashtra State Olympic Games inaugurated by Chief Minister Eknath Shinde
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
खेळाच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षक शासनातर्फे देण्यात येतील –मुख्यमंत्री
खेळाडूंना परदेशी प्रशिक्षकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : राज्यात खेळाच्या विकासासाठी आंतरराष्टीय दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षक शासनातर्फे देण्यात येतील. क्रीडा विकासासाठी कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही. खेळाडूंनी क्रीडा सुविधांचा लाभ घेवून राज्याचा नावलौकिक जगात उंचवावा आणि राज्याचे नाव सातासमुद्रापार पोहोचवावे. खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनद्वारा आयोजित महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे मुख्यमंत्री श्री.शिंदे याच्या हस्ते म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा मंत्री गिरीश महाजन, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, विभागीय आयुक्त सौरभ राव, क्रीडा आयुक्त डॉ.सुहास दिवसे, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, शासनाने क्रीडा क्षेत्राला प्राधान्य दिले आहे. राज्यातील उत्कृष्ट खेळाडूंचा डाटाबेस तयार करीत आहोत. यामुळे भविष्यात चांगले खेळाडू घडविण्यास मदत मिळेल. १५५ क्रीडा संकुल राज्यात असून त्यात आणखी १२२ संकुलांची भर घालण्यात येणर आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी खेळाडुंच्या बक्षीसाच्या रकमेत ५ पट वाढ केली आहे. जागतिक नेमबाजी स्पर्धेत यश मिळवलेल्या ठाण्याच्या रुद्रांश पाटील याला दोन कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले. यातून खेळाडूंना प्रेरणा मिळेल. राज्याच्या क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल.
जिद्द, कष्ट आणि चिकाटीच्या बळावर पदक मिळवा
राज्यात तालुका, जिल्हा, आणि राज्य पातळीवर विविध स्पर्धांचे आयोजन होते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यासाठी हे टप्पे महत्वाचे आहेत. म्हणून खेळाडूंनी प्रत्येक टप्प्यावर जिद्द, कष्ट, चिकाटी दाखवली तर ऑलिम्पिकमध्ये नक्कीच यश मिळेल. अपयशी होणाऱ्या खेळाडूंनी खचून न जाता पुढील स्पर्धेत यश मिळविण्याची जिद्द बाळगावी. पुन्हा नव्या उत्साहाने खेळायला सुरूवात करावी. इंटरनेट-मोबाईलच्या जगात मैदानावर खेळणे अत्यंत आवश्यक आहे. खेळल्याने शरीर आणि मन कणखर होईल आणि आव्हाने पेलण्याची ताकद मिळेल.
स्पर्धा ही खेळाची दिंडी, झेंडा निराळा तरी रंग खेळाचा
ऑलिम्पिक शब्दात एक जादू आहे. स्पर्धेच्या निमित्ताने इथे खेळाची दिंडी आपण पाहतो आहे. प्रत्येकाच्या हातात वेगळा झेंडा असला तरी रंग एकच असतो, तो म्हणजे खेळाचा. म्हणून आपण खेळाडूंना महत्व देतो. १० हजार पेक्षा अधिक खेळाडुंचा या स्पर्धेत सहभाग आहे. सर्वाधिक पदके मिळविणाऱ्या जिल्ह्याला चषक प्रदान करण्यात येणार आहे असे सांगून उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशन आणि खेळाडूचे अभिनंदन केले.
गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत १४० पदके मिळवून आपल्या खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळवून दिला. त्याबद्दल त्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. राज्य उद्योग किंवा पायाभूत सुविधेतच पुढे नाही तर खेळातही पुढे आहे. आपल्याला नक्कीच ऑलिम्पिकमध्ये पदक मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
खेळाडूंना परदेशी प्रशिक्षकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडियाच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला संधी उपलब्ध करून दिली. महाराष्ट्रातही महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिकच्या माध्यमातून शासनाने खेळाडूंना ती संधी उपलब्ध करून दिली आहे. जीवनात खेळ महत्वाचा आहे, त्यापेक्षाही खिलाडूवृत्ती महत्वाची आहे. त्यामुळे जिंकण्याची जिद्द तयार होते. पराजयातून उभे राहून जिंकण्याची जिद्द मनामध्ये खेळाच्या माध्यमातून निर्माण होते.
राज्यात खेळांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहे. चांगले खेळाडू तयार करण्यासाठी परदेशी प्रशिक्षकांनाही आमंत्रित करण्यात येईल. त्याचा सर्व खर्च शासनाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय राज्य शासन घेईल. आपला खेळाडू देशासाठी-राज्यासाठी खेळतो. निरज चोप्रासारखा खेळाडू जेव्हा सुवर्ण पदक मिळवतो आणि ऑलिम्पिकच्या मैदानावर राष्ट्रगीत वाजताना भारताचा तिरंगा वरवर जातो, तेव्हा संपूर्ण देशाला त्याचा गौरव वाटतो, तोच देशाचा गौरव असतो. हेच खरे खेळाडूला मिळालेले पदक असते. सहभागी खेळाडू असे पदक देशाला मिळवून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मेहनतीने खेळा, ताकदीने खेळा, पूर्ण जोर लावून खेळा अशा शुभेच्छा देऊन त्यांनी पदक मिळवणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन केले. पराभूत होणाऱ्या खेळाडूंनी पदक मिळविण्याच्या जिद्दीने पुन्हा एकदा स्पर्धेत सहभागी व्हावे, त्यांनी कोणी थांबवू शकणार नाही. असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
‘बाज की असली उडान अभी बाकी है, हमारे इरादो का इम्तिहान अभी बाकी है, अभी नापी है मुठ्ठीभर जमीं हमने, अभी तो पुरा आसमान बाकी है,’ अशा शब्दात त्यांनी खेळाडूंचा उत्साह वाढवला.
दर दोन वर्षांनी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन-गिरीश महाजन
क्रीडा मंत्री श्री.महाजन म्हणाले, जोपर्यंत तंत्रशुद्ध पद्धतीने खेळ खेळला जात नाही तोपर्यंत पदके प्राप्त करता येणार नाही. त्यासोबत खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आधुनिक खेळ हा कौशल्य आणि क्षमतेवर आधारित आहे. त्यामुळे शालेय जीवनापासूनच हे कौशल्य देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. राज्य शासनाने राष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडुंच्या पुरस्कार रकमेत भरीव वाढ करण्यात केली आहे. खेळाडूंना प्रथमच राष्ट्रीय स्पर्धांसाठी विमान प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. शासन खेळाडूंना विशेष सुविधा देण्यात येणार आहे. महाराष्ट्राला राष्ट्रकूल स्पर्धेत आठ पदके मिळाली. देशाच्या पंतप्रधानांनी खेळाडूंसोबत स्वत: संवाद साधला हे प्रथमच घडले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात खेळासाठी चांगल्या सुविधा निर्माण करण्यात येत आहे. शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे ऑलिम्पिक भवन निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष श्री. पवार यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच ही राज्यस्तरीय मोठी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल राज्य शासन तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, क्रीडा संघटनांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, क्रीडापटुंच्या कामगिरीवर क्रीडा चळवळ पुढे जात असते. राज्यातील ९ शहरात ही स्पर्धा आयोजित केल्याने संपूर्ण राज्यात खेळाची वातावरण निर्मिती झाली आहे. खेळात हार-जीत, जय पराजय होणारच. परंतु सर्वोच्च क्षमता पणाला लावून खेळाडूंनी कामगिरी करावी. खेळ भावनेने रसिकांची मने जिंकावीत. चुकीचे काही घडणार नाही याची काळजी घ्यावी, पराभवातून खचू नये. क्रीडा संस्कृती वाढवणे, रुजवणे याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. राज्यात प्रत्येकाने एक तरी मैदानी खेळ खेळला पाहिजे. खेळ वैयक्तिक पातळीवर निरोगी करत नाहीत तर समाजमन निकोप करण्यासाठी उपयुक्त होतात. देशी खेळांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू, असेही श्री. पवार म्हणाले.
प्रास्ताविकात श्री.दिवसे यांनी स्पर्धेच्या आयोजनाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, राज्यात २३ वर्षानंतर या स्पर्धेचे आयोजन होत आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या धर्तीवर ३९ खेळांचा समावेश या स्पर्धेत करण्यात आला असून त्यापैकी ७ खेळांचा प्रथमच समावेश होत आहे. राज्यातील ८ जिल्ह्यात विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्पर्धेच्या क्रीडाज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले. क्रीडा मंत्री श्री.महाजन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष श्री. पवार यांनी राज्याने ३६ व्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल राज्याला प्राप्त झालेला चषक मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. शेवटी तो मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी क्रीडा आयुक्तांकडे सुपूर्द केला. राज्याच्या ३६ जिल्ह्यातून आलेल्या खेळाडूंचे प्रातिनिधिक संचलन यावेळी करण्यात आले. यावेळी रिदमिक जिम्नॅसिटकच्या खेळाडूंनी शानदार प्रात्यक्षिके सादर केली. खेळाडूंना खेळाची शपथ देण्यात आली. प्रारंभी कलाकारांनी सादर केलेल्या शानदार गणेश वंदनेने कार्यक्रमाला सुरूवात झाली. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत मल्लखांब खेळाडूंनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली तसेच चित्ताकर्षक इलुमिनाती कार्यक्रमाचेही सादरीकरण करण्यात आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com