Goa’s Manohar International Airport begins operations
गोवा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिचालनाला सुरुवात
पणजी : गोव्यात मोपा येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिचालनाला कालपासून सुरुवात झाली. विमानतळ परिसरात आयोजित कार्यक्रमादरम्यान मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्या प्रवासी विमानाचे आगमन तसेच उड्डाण झाले.
केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल (निवृत्त)व्ही. के. सिंह आजकालच्या उद्घाटन सोहोळ्यात आभासी पद्धतीने सहभागी झाले.केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग तसेच पर्यटन राज्य मंत्री श्रीपाद नाईक आणि गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत या वेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 डिसेंबर 2022 रोजी गोवा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले.
कार्यक्रमातील उपस्थितांना आभासी पद्धतीने संबोधित करताना केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल (निवृत्त)व्ही. के. सिंग यांनी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कार्य यशस्वीपणे सुरु करण्यात सहभागी असलेल्या सर्व भागधारकांचे अभिनंदन केले.गोवा राज्य तसेच देशाच्याही आर्थिक विकासाला चालना देण्यात हे नवे विमानतळ अनेक प्रकारे अत्यंत उपयुक्त ठरेल याचा विशेष उल्लेख देखील त्यांनी केला.
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग तसेच पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले, “गोवा राज्यासाठी, गोव्यातील लोकांसाठी आणि माझ्यासाठी देखील आज सुवर्णदिन आहे.” संसद सदस्य म्हणून पहिल्या कार्यकाळात, तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली, हवाई वाहतूक मंत्रालयाच्या कार्यात सहभागी होण्याची संधी आपल्याला मिळाली होती याबद्दलच्या स्मृतींना त्यांनी उजाळा दिला. “त्यावेळी मनोहर पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री होते आणि आम्ही एकत्रितपणे या विमानतळाच्या उभारणीचे कार्य सुरु केले. आज आमची सर्व स्वप्ने पूर्ण झाली आहेत,” केंद्रीय मंत्री म्हणाले.
श्रीपाद नाईक पुढे म्हणाले की, या नव्या विमानतळामुळे या भागातील पर्यटन क्षेत्राला मदत होईल तसेच गोव्याला फळे, भाजीपाला आणि मासे यांसारख्या नाशिवंत वस्तूंच्या निर्यातीचे मोठे केंद्र म्हणून स्थापित करणे शक्य होईल. यातून नव्या रोजगार संधी निर्माण होतील, स्थानिकांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि देशभरातील पर्यटक या भागाकडे आकर्षित होतील. केंद्र सरकार गोव्याच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित करत असून नजीकच्या भविष्यात असेच आणखी काही प्रकल्प यथे उभारले जातील असे त्यांनी सांगितले.
गोवा हे पारंपरिकरित्या अत्यंत लोकप्रिय पर्यटन केंद्र आहे, मात्र दाबोलीम विमानतळ हे संरक्षण विभागाचे विमानतळ असल्यामुळे येथील हवाई वाहतुकीला मर्यादा आहेत असे मत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. या नव्या विमानतळाच्या माध्यमातून आता गोवा नव्या 18 परदेशी ठिकाणांशी तर 30 देशांतर्गत नवीन ठिकाणांशी थेट जोडले जाणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
ते पुढे म्हणाले की, गोव्यामध्ये फिरणाऱ्या पर्यटकांसाठी हळूहळू नियमित स्वरूपातील टॅक्सी सेवा उपलब्ध होत असून, तोपर्यंत, राज्य सरकार पर्यटकांच्या सोयीसाठी कदंबा वाहतूक महामंडळाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक बसचा ताफा उपलब्ध करून देत आहे. विमानतळावरून संचालित केल्या जाणाऱ्या प्रवासी आणि मालवाहतूक सेवांमुळे, आता गोवा या उपखंडातील सर्वात आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येईल असे ते म्हणाले.
विमानांच्या इंधनावरील मूल्यवर्धित करात नुकतीच 18% वरुन 8% अशी कपात करून राज्य प्रशासनाने अत्यंत सकारात्मक पाऊल उचलले आहे अशी टिप्पणी त्यांनी केली. पर्यटन, मालवाहतूक, हवाई प्रवास आणि संबंधित क्षेत्रांमध्ये गोवा राज्याला प्रचंड यश मिळवून देण्याच्या उद्देशाने राज्य सरकार सर्व संबंधित भागधारकांना मनःपूर्वक पाठींबा देण्याप्रती समर्पित आहे अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिचालनाला सुरुवात झाल्याबद्दल केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी ट्विटर संदेशाद्वारे आनंद व्यक्त केला आहे.विमानतळाचे कार्य सुरु होणे तसेच विमानाच्या इंधनाच्या मूल्यवर्धित कराचे सुसूत्रीकरण या दोन्ही घडामोडी भारताचे प्रवेशद्वार या रुपात गोव्याचे धोरणात्मक महत्त्व वृद्धींगत करतील आणि गोवा राज्यासाठी पर्यटनाची तसेच रोजगाराची नवी द्वारे उघडून देतील अशी आशा सिंदिया यांनी त्यांच्या ट्विट संदेशात व्यक्त केली आहे.
माजी संरक्षणमंत्री तसेच गोव्याचे मुख्यमंत्रीपद चार वेळा भूषविणारे मनोहर पर्रिकर यांना श्रद्धांजली म्हणून गोव्यातील मोपा येथे उभारण्यात आलेल्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ – मोपा, गोवा’ असे नामकरण करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पूर्व लक्षी प्रभावाने मंजुरी दिली.
पार्श्वभूमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2016 मध्ये या आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी केली होती.
सुमारे 2,870 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा विमानतळ शाश्वत पायाभूत सुविधांच्या मध्यवर्ती संकल्पनेवर बांधण्यात आला आहे आणि त्यात सौर उर्जा संयंत्रे, पर्यावरण स्नेही इमारती, धावपट्टीवर एलईडी दिवे, पर्जन्य जल संधारण, पुनर्वापर प्रक्रियेच्या व्यवस्थेसह अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र यांसह इतर अनेक सुविधांचा समावेश आहे.
सुरुवातीला, पहिल्या टप्प्यात या विमानतळावर दर वर्षी अंदाजे 4.4 दशलक्ष प्रवासी प्रवास करू शकतील आणि या क्षमतेमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करून वार्षिक 33 दशलक्ष प्रवासी क्षमतेपर्यंत त्याचा विस्तार केला जाईल. या विमानतळाच्या बांधकामात गोव्याचे स्थानिक वैशिष्ट्य असलेल्या अझुलेजोस टाईल्सचा वापर करण्यात आला आहे. येथील फूड कोर्टमध्ये गोव्याचे खास वैशिष्ट्य असलेल्या कॅफेची निर्मिती करणसाठी विशेष जागा ठेवण्यात आली आहे जिथे स्थानिक कारागीर आणि हस्तकलाकार त्यांच्या कलाकुसरीच्या वस्तू प्रदर्शित करू शकतील आणि त्यांची विक्री देखील करू शकतील.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com