Showcasing Pune’s cultural richness on the occasion of ‘G20’ conference
‘जी २०’ परिषदेच्या निमित्ताने पुण्याच्या सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन घडवा
-मनुकुमार श्रीवास्तव
पुणे : ‘जी २०’ बैठकीच्या निमित्ताने पुणे येथे येणाऱ्या प्रतिनिधींचे स्वागत करताना पुण्याच्या सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन घडवावे; पुणेरी ढोल पथकाच्या साथीने प्रतिनिधींचे स्वागत करावे, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी दिल्या.
जी २० बैठकीच्या पूर्वतयारीबाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, पुणे येथून विभागीय आयुक्त सौरभ राव, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त वर्षा लड्डा आदी उपस्थित होते.
पुणे जिल्ह्याने बैठकीची चांगली तयारी केल्याचे नमूद करून मुख्य सचिव श्रीवास्तव म्हणाले, येणाऱ्या अतिथींसमोर चित्रफीतीच्या माध्यमातून पुण्याचे आणि राज्याचे वैभव मांडावे. बैठकांच्या ठिकाणी जिल्ह्यातील विकास आणि संस्कृतीविषयक बाबी मांडण्यात याव्यात. औरंगाबाद आणि नागपूर येथेदेखील अशा बैठका होणार असल्याने तेथील अधिकाऱ्यांना पुण्याची तयारी पाहण्यासाठी आमंत्रित करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. मुख्य सचिवांनी सुरक्षाविषयक आणि बैठकीच्या ठिकाणी करण्यात येत असलेल्या तयारीचाही आढावा घेतला.
प्रतिनिधींचे विमानतळावर पारंपरिक पद्धतीने स्वागत-सौरभ राव
पुण्याच्या तयारीविषयी माहिती देताना विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, या बैठकांच्या पूर्वतयारीत नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी सायकल रॅली, स्वच्छता मोहीम, शाळा-महाविद्यालयातून चर्चासत्र व बैठकांचे प्रात्यक्षिक, बाईक रॅली, वॉकथॉन आदी उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. येणाऱ्या प्रतिनिधींचे विमानतळावर पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात येईल. भोजनामध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्ताने या धान्यापासून तयार केलेल्या पदार्थांचा अंतर्भाव करून त्याची माहितीदेखील देण्यात येणार आहे.
बैठकीच्या ठिकाणी पुण्यातील पायाभूत सुविधा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, एमटीडीसी, खादी ग्रामोद्योग, सामाजिक वनीकरण आदी विविध दालनांच्या माध्यमातून पुण्याच्या क्षमता प्रदर्शित करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वृक्षारोपण व पाहुण्यांच्या स्वागताप्रित्यर्थ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तम नियोजनाद्वारे बैठक यशस्वी करण्यासाठी प्रशासनातील सर्व विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी दिली.
बैठकीनिमित्त शहरातील चौकांचे सुशोभिकरण-विक्रम कुमार
विक्रम कुमार म्हणाले, शहरातील विविध चौकात ७५ आकर्षक शिल्पे उभारण्यात आली आहे. रस्त्याच्या कडेला सुशोभिकरण आणि विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. वातावरण निर्मितीसाठी महानगरपालिकेने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. या तयारीत नागरिकांकडूनही उत्स्फुर्त सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com