Action taken against 6 YouTube channels for spreading rumors and misinformation
अफवा आणि चुकीची माहिती पसरवल्याबद्दल ६ यु ट्यूब चॅनल वर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची कारवाई
- बनावट बातम्या प्रसारित करून कमाई केलेल्या ; सहा यूट्युब वाहिन्यांवरील 50 कोटींहून अधिक वेळा पाहिलेल्या शंभरहून अधिक चित्रफितींचा पीआयबी फॅक्ट चेकने केला पर्दाफाश
- बनावट बातम्यांच्या अर्थव्यवस्थेचा भाग आणि 20 लाखांहून अधिक एकत्रित फॉलोअर्स असलेल्या यूट्युब वाहिन्यांवर कारवाई
- प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी क्लिकबेट लघुप्रतिमा (थंबनेल ) वापरून या वाहिन्या राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि निवडणूक आयोगाशी संबंधित खोट्या बातम्या पसरवत होत्या
नवी दिल्ली : समन्वयाने काम करून भारतात खोटी माहिती पसरवत असलेल्या सहा यूट्यूब वाहिन्यांचा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पीआयबी फॅक्ट चेक कक्षाने पर्दाफाश केला आहे. या वाहिन्यांद्वारे पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्यांचे खंडन करण्यासाठी 100 हून अधिक तथ्य-तपासण्यांचा समावेश असलेल्या सहा वेगवेगळ्या ट्विटची मालिका फॅक्ट चेक कक्षाने जारी केली आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या कक्षाची ही अशा प्रकारची ही दुसरी कारवाई आहे या कारवाईच्या माध्यमातून संपूर्ण वाहिन्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
या सहाही युट्युब वाहिन्या एका समन्वित अपप्रचार नेटवर्कचा भाग म्हणून कार्यरत असल्याचे आढळले, या वाहिन्यांची सदस्यसंख्या जवळपास 20 लाख होती आणि त्यांच्या चित्रफिती 51 कोटींहून अधिक वेळा पाहिल्या गेल्या आहेत.
पीआयबी फॅक्ट चेक कक्षाने कारवाई केलेल्या यूट्यूब वाहिन्यांनी निवडणुका, सर्वोच्च न्यायालय आणि भारताच्या संसदेतील कार्यवाही, भारत सरकारचे कामकाज इत्यादींबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या.इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील बंदीबाबत खोटे दावे आणि भारताचे माननीय राष्ट्रपती, भारताचे माननीय सरन्यायाधीश यांच्यासह वरिष्ठ घटनात्मक अधिकाऱ्यांची बनावट विधाने दाखवणे याचा यात समावेश आहे.
बनावट बातम्यांच्या आधारावर कमाई करणाऱ्या या वाहिन्या बनावट बातम्यांच्या अर्थव्यवस्थेचा भाग आहेत . प्रेक्षकांची दिशाभूल करण्यासाठी आणि या बातम्या खऱ्या आहेत यावर प्रेक्षकांचा विश्वास बसावा तसेच कमाई करण्याच्या दृष्टीने ,या वाहिन्यांद्वारे प्रसारित चित्रफितीच्या माध्यमातून ,वाहिनीवर प्रेक्षक संख्या वाढावी यासाठी या वाहिन्या बनावट, क्लिकबेट आणि सनसनाटी लघुप्रतिमा (थंबनेल) आणि दूरचित्रवाहिन्यांवरील वृत्त निवेदकाच्या प्रतिमा वापरत होत्या.
पीआयबी फॅक्ट चेक कक्षाने केलेली ही अशाप्रकारची दुसरी कारवाई आहे. यापूर्वीच्या एका मोठ्या कारवाईत, 20 डिसेंबर 2022 रोजी,या कक्षाने खोट्या बातम्या पसरवणाऱ्या तीन वाहिन्यांचा पर्दाफाश केला होता.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com