The first meeting of the G-20 Council’s Infrastructure Working Group will be held in Pune from tomorrow
पुण्यात उद्यापासून जी-२० परिषदेच्या पायाभूत सुविधाविषयक कार्यकारी गटाची पहिली बैठक
पुणे : महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला भेट देऊन परिषदेच्या बैठकीच्या तयारीची पाहणी केली. जी २० परिषदेतील कार्यकारी गटाची एक बैठक, तसंच शाही मेजवानी आणि सांस्कृतिक कार्यक्रम विद्यापीठात होणार आहेत. त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी रंगमंच उभारणीचं काम सुरू आहे. यावेळी पाटील यांनी विद्यापीठातील कर्मचारी वर्ग आणि उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
श्री. पाटील म्हणाले, भारताच्या नेतृत्वात जी-२० परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. जी-२० परिषदेच्या माध्यमातून आपले भविष्य घडविण्यासाठी आपल्याला मिळालेली संधी आहे, असे त्यांनी सांगितले. जी-२० आणि भारत तसेच देशातील तरुण पिढीचा असणारा संबंध मांडून भारत देश कशा पद्धतीने जगाचे नेतृत्व करण्यास तयार झाला आहे याची माहिती त्यांनी दिली.
आविष्कार नगरीत सादर करण्यात आलेल्या संशोधन प्रकल्पांना भेट देऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यशस्वी संशोधन प्रकल्पांची उद्योग क्षेत्राशी सांगड घालून स्टार्टअपसाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल, श्री. पाटील म्हणाले.
जी-वीस परिषदेनिमित्त विद्यापीठात काल ‘भविष्यातील शहरांसाठी’ या विषयावर व्याख्यानाचं आयोजनही करण्यात आलं होतं. शहरांच्या पायाभूत सुविधांवर भर द्यायला हवा. मात्र यासाठी तात्पुरते उपाय न करता शाश्वत उपायांचा अवलंब करावा असं मत सुरत महापालिकेच्या आयुक्त शालिनी अगरवाल यांनी व्यक्त केलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com