1st meeting of G20 Infrastructure Working Group under India’s G20 presidency begins in Pune
जी 20 परिषदेच्या पायाभूत सुविधाविषयक कार्यकारी गटाच्या पहिल्या बैठकीला पुण्यात प्रारंभ
पुणे: देशाच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टीनं जी 20 परिषदेची पुण्यात होत असलेली बैठक अतिशय महत्त्वाची असून या माध्यमातून देशातल्या पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र सुधारणा होणार आहे. जागतिक विकासाच्या पातळीवर देश पाचव्या स्थानापर्यंत पोहोचण्यात त्याचा मोठा उपयोग होणार असल्याचा विश्वास केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
जी 20 परिषदेच्या पायाभूत सुविधाविषयक कार्यकारी गटाची पहिली बैठक आजपासून पुण्यात सुरू झाली; याचं उद्घाटन राणे यांच्या उपस्थितीत झालं; त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
गेल्या आठ वर्षांपासून आपल्या देशाची वाटचाल दारिद्र्य आणि बेरोजगारी निर्मूलनाच्या दिशेनं वेगानं होत असून पायाभूत सुविधांच्या माध्यमातून देशाचा त्याचबरोबर प्रत्येक देशवासियांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकार वचनबध्द असल्याचं राणे म्हणाले.
आगामी 3 वर्षात देश जगातील 5 प्रमुख राष्ट्रांच्या पंक्तीत नेऊन बसवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. 50 टक्के लोकसंख्या शहरांमधून राहत असून त्यांना अधिक चांगल्या प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं जी 20 सारख्या परिषदेचा फार उपयोग होईल, असं ते म्हणाले. पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर या बैठकीत चर्चा अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं.
जागतिक पातळीवर काही प्रमाणात मंदीचं वातावरण असलं तरी भारतात त्याचा परिणाम दिसू नये यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं राणे म्हणाले. उद्योगांचं आधुनिकीकरण करतानाच जास्तीत जास्त रोजगार त्यातून उपलब्ध व्हावेत यादृष्टीने योग्य तो समन्वय राखला जात असल्याचं ते म्हणाले.
जी 20 परिषदेमध्ये आज दुपारी “शहरीकरण” या विषयावर विविध परिसंवाद होतील. त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सावित्रीबाई फुले विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com